लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी मुंबईत काळ्या-पिवळ्या टॅक्सीही व्यग्र होणार आहेत. जवळपास १,३०० टॅक्सी २८ व २९ एप्रिल रोजी निवडणुकीच्या कामानिमित्त आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही दिवशी मुंबईकरांना काळय़ापिवळय़ा टॅक्सींची कमतरता भासू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्याही निवडणुकीसाठी निवडणूक आयोग व परिवहन विभागाकडून मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आरक्षित करण्यात येतात. निवडणुकीच्या कामासाठी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ने-आण करणे, निवडणुकीचे साहित्य संबंधित ठिकाणी पोहोचविणे आदी विविध कामांसाठी या टॅक्सींचा वापर केला जातो. टॅक्सी संघटनांची सहमती घेऊन व त्यांच्यासोबत बैठका आयोजित करून निवडणूक काळात आवश्यकतेनुसार टॅक्सींचे नियोजन केले जाते.

मुंबईत २९ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी मोठय़ा संख्येने टॅक्सी आरक्षित करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात अलीकडेच पार पडलेल्या बैठकीस मुंबई टॅक्सीमेन्स युनियनसह अन्य संघटना, आरटीओ व निवडणूक अधिकारी उपस्थित होते. यावेळी निवडणूक कामांसाठी १,३०० टॅक्सी आरक्षित करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुंबई शहरात ८०० आणि उपनगरात ५०० टॅक्सी निवडणुकीच्या कामासाठी व्यस्त राहणार आहेत. प्रत्येक टॅक्सीचालकाला त्याचा मोबदलाही देण्यात येणार आहे.

दोन दिवस टॅक्सी निवडणुकीच्या कामासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. या कामासाठी टॅक्सीचालकांना २४ तासांसाठी २,०१३ रुपये मोबदला देण्यात येणार आहे. तर अतिरिक्त कामासाठी १३२ रुपये देण्यात येणार आहेत. मुंबईतील टॅक्सी सीएनजी गॅसवर धावतात. गेल्या दोन वर्षांत सीएनजीच्या किमतीमध्ये तीन वेळा वाढ झाली आहे. तर आता पुन्हा गॅस महागला. त्यामुळे २४ तासांसाठी देण्यात येणाऱ्या मोबदल्यात ३०० ते ४०० रुपयांची वाढ करावी अशी मागणी करण्यात आली होती, असे मुंबई टॅक्सी युनियनचे महासचिव ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले.

निवडणुकीच्या कामासाठी आरक्षित करण्यात आलेल्या टॅक्सीकरिता चालकाला देण्यात येणारा मोबदला मीटरनुसार आकारण्यात आला आहे. त्यामुळे मोबदल्यात वाढ करण्याची मागणी अमान्य करण्यात आली. परिणामी, निवडणूक आयोगाकडून देण्यात येणारा मोबदला स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे क्वाड्रोस यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taxis scarcity on voting day
First published on: 11-04-2019 at 01:31 IST