शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी किंवा त्यांनी काही चूक केल्यास शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा देतात ही बाब सर्वसामान्य झाली आहे. यासंदर्भात काही ठिकाणी विरोध केला जात असला, तरी विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी हे आवश्यकच असल्याचं मानणारा देखील पालकांमधला एक गट आहे. मात्र, शिक्षकानं चूक केली असं वाटून त्यांनाच झाडाला बांधून विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा एक अजब प्रकार झारखंडमध्ये घडला आहे. झारखंडच्या डुमका जिल्ह्यात ही घटना घडली असून यामुळे पोलीसही चक्रावले आहेत. मात्र, त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे शाळेकडून यावर तक्रारच दाखल करण्यात आली नसल्यामुळे पोलिसांनीही कोणती कारवाई केलेली नाही.

नेमकं घडलं काय?

हा सगळा प्रकार सोमवारी घडल्याचं सांगितलं जात आहे. डुमका जिल्ह्याच्या गोपीकंदर भागात असलेल्या एका निवासी शाळेतील मुलं अचानक आक्रमक झाली. नुकताच त्यांचा परीक्षेचा निकाल लागला होता. मात्र, यामध्ये आम्हाला कमी मार्क देण्यात आल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. शाळेतील नववीच्या वर्गातल्या एकूण ३२ विद्यार्थ्यांपैकी जवळपास ११ विद्यार्थ्यांना दुहेरी ड श्रेणी देण्यात आली होती. ही श्रेणी म्हणजे दुसऱ्या शब्दांत नापासचाच शेरा मानला जातो. शिक्षकांनी प्रात्याक्षिकांचे गुण अतिशय कमी दिल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून केला जात होता.

शिक्षक म्हणतात…

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रागाच्या भरात त्यांचे शिक्षक कुमार सुमन यांनाच झाडाला बांधलं. विद्यार्थ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा देखील सुमन यांनी केला आहे. “विद्यार्थ्यांनी मला बैठक करण्यासाठी बोलावलं होतं. त्यांचे निकाल चुकीचे लावण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण अंतिम निकालामध्ये प्रात्याक्षिकांचे गुण समाविष्टच न झाल्यामुळे हे घडलं होतं. ही जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असल्यामुळे आम्हाला त्यावर कोणतीही भूमिका त्यावेळी घेता आली नाही”, असं सुमन यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, यासंदर्भात डुमकाच्या शिक्षण अधिकाऱ्यांनीही आपली भूमिका मांडली आहे. “आम्हाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही शिक्षकांसोबत चर्चा केली. आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की त्यांना प्रात्याक्षिकांमध्ये कमी गुण देण्यात आले आहेत. शिक्षकांकडून देखील याची योग्य प्रकारे दखल घेण्यात आली नसल्याची त्यांची तक्रार होती”, अशी प्रतिक्रिया गोपीकंदर भागातील ब्लॉग शिक्षणाधिकारी सुरेंद्र हेब्राम यांनी दिली.

अंतर्गत वाद?

दरम्यान, मारहाण करण्यात आलेले कुमार सुमन हे पूर्वी त्या शाळेचे मुख्याध्यापक होते, मात्र त्यांना पदावरून दूर करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शाळेतील अंतर्गत वादातूनच हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त होऊ नये, म्हणून कोणतीही तक्रार करत नसल्याची भूमिका शाळा व्यवस्थापनाकडून जाहीर करण्यात आली आहे.