Crime News : ३२ वर्षांच्या एका शिक्षिकेने तीन वर्षांच्या मुलीला मांडीवर घेत स्वतःवर आणि मुलीवर पेट्रोल ओतलं आणि मग जिवंत जाळून घेत मुलीसह आत्महत्या केली. संजू असं या शिक्षिकेचं नाव आहे. तिच्या तीन वर्षांच्या मुलीचा या घटनेत जागीच मृत्यू झाला तर संजूला रुग्णालयात नेण्यात आलं होतं पण तिथे उपचारांच्या दरम्यान संजू या शिक्षिकेची प्राणज्योतही मालवली. ही घटना राजस्थानच्या जोधपूरमधली आहे. संजूच्या माहेरच्या लोकांनी तिच्या सासरच्या मंडळींवर मानसिक आणि शारिरीक छळाचा आरोप केला आहे. तसंच हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी तगादा लावला होता ज्याला कंटाळून संजूने आयुष्य संपवल्याचा आरोप संजूच्या माहेरच्यांनी केला आहे.
संजूच्या कुटुंबाचा आरोप नेमका काय?
संजूच्या कुटुंबाने हे म्हटलं आहे की संजूने आत्महत्येपूर्वी तिचा पती, सासरचे लोक, नणंद यांची नावं घेतली. या सगळ्यांनी तिचा मानसिक छळ केला. संजूच्या मागे हुंड्यासाठी तगादा लावला गेला असंही तिच्या कुटुंबाने सांगितलं. संजूचे वडील ओमजी म्हणाले, “माझ्या मुलीला तिच्या नवऱ्याने, सासरच्या मंडळीनी छळलं. तिने नाईलाजाने हे टोकाचं पाऊल उचललं. माझी तीन वर्षांची नातही जग सोडून गेली.” दरम्यान पोलिसांना या प्रकरणात सुसाईड नोटही मिळाली आहे.
संजूच्या काकांचाही सासरच्या लोकांवर गंभीर आरोप
संजूच्या सासऱ्यांनी तिच्या वडिलांना सांगितलं की संजूने स्वतःला पेटवून घेतलं आहे, तुम्ही घरी या. आम्ही घरी गेलो तेव्हा तिला तशाच अवस्थेत ठेवलं होतं. रुग्णालयातही नेलं नव्हतं. घरात दोन गाड्या होत्या, पण एकाही गाडीने माझ्या मुलीला रुग्णालयात नेण्याची तसदी कुणी घेतली नाही असंही तिच्या वडिलांनी सांगितलं. संजूचे काका हुकमाराम बिश्नोई म्हणाले माझी पुतणी शिकलेली होती. ती शिक्षिका होती आणि ती तिचं आयुष्य संपवू असा विचार करणारी नव्हती. तरीही तिने हे टोकाचं पाऊल उचललं म्हणजे तुम्ही विचार करा की तिचा किती छळ झाला असेल. तिचा प्रचंड छळ करण्यात आला होता त्यामुळेच तिने स्वतःला संपवलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.