एकेकाळी आर्सेनिकमिश्रित भूजलामुळे रोगांना सामोरे जाणाऱ्या पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर असलेल्या गैघाटा गावाने तळ्यांमधील पाणी शुद्ध करून शेजारील खेडय़ांना बाटलीबंद पाण्याची विक्री सुरू केली आहे. या खेडय़ाची यशोगाथा फ्रान्सच्या अभिनव तंत्रज्ञानामुळे शक्य झाली आहे.
गैघाटा या खेडय़ातील मधुसुदनकाटी सांबे कृषी उन्नयन समिती या संस्थेने जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला त्यात तळ्यातील पाणी शुद्ध करून ते पिण्यायोग्य केले जाते. ही सहकारी संस्था आर्सेनिक मुक्त पेयदल पुरवते. नॉर्थ २४ परगणा जिल्ह्य़ात हे पाणी ५० पैसे लिटरने विकले जाते. सध्या रोज २००० लिटर पाणी शुद्ध करून विकले जाते. आजूबाजूच्या खेडय़ातील २०० कुटुंबे आमचे ग्राहक आहेत असे सहकारी सोसायटीचे अध्यक्ष हलधर शर्मा यांनी सांगितले.
या पेयजल प्रकल्पाचे नाव सुलभ जल असे असून सुभत्र इंटरनॅशनलने त्याची कल्पना मांडली आहे. सुलभचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी सांगितले की, जलशुद्धीकरण तंत्रज्ञानाची चाचणी कंबोडिया व मादागास्कर येथे करण्यात आली पण त्याचा मोठय़ा प्रमाणात वापर प्रथम पश्चिम बंगालमधील या खेडय़ात करण्यात आला.
गैघाटा हे भारत-बांगलादेश सीमेपासून १४ किलोमीटर अंतरावरचे गाव आहे. तुरटी, अतिनील किरण यांच्या मदतीने यात पाणी शुद्ध केले जाते. जलशुद्धीकरणाचा खर्च ३० पैसे असून वितरण, साठवण या इतर बाबींचा खर्च २० पैसे आहे व हे पाणी आम्ही लिटरला ५० पैसे दराने विकू शकतो. रोज गावकारी या प्रकल्पात येतात व २० लिटर पाणी घेतात. विष्णूपूर, फरीदकाटी व तेघोरिया या खेडय़ातील लोकही हे पाणी विकत घेण्यासाठी रांगा लावतात. यापूर्वी ते आर्सेनिक असलेले पाणी नाईलाजाने पित होते. तलावातले पाणी आर्सेनिक मुक्त असले तरी ते पिण्यालायक नाही.
 या प्रकल्पाची किंमत २० लाख रुपये आहे, ती १००१ फांउटन, सुलभ व गावकरी यांच्यात वाटून घेण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील नऊ जिल्ह्य़ात नॉर्थ परगणा जिल्ह्य़ासह नऊ जिल्ह्य़ात आर्सेनिकचे प्रदूषण आहे व त्याचा फटका १६ दशलक्ष ग्रामीण लोकांना बसला आहे. १२ दशलक्ष लोकांना शहरांमध्ये लोकांना याचा फटका बसला आहे असे इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक हेल्थ इंजिनियर्स संस्थेचे अध्यक्ष के.जे.नाथ यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आर्सेनिक असलेले पाणी वापरल्यास त्वचेचे रोग होतात. त्यात त्वचेचा कर्करोग, पित्ताशय, मूत्रपिंड, फुफ्फुस यांचे विकार होतात तसेत इतर रोगही होतात.

* रोजची शुद्धीकरण क्षमता २००० लिटर
* खर्च – ५० पैसे
* विक्री किंमत ५० पैसे लिटर
* प्रकल्पाची किंमत- २० लाख रूपये
* सहभाग- सुलभ इंटरनॅशनल , गैघाटाचे गावकरी