Telangana Murder तेलंगणातील कुरनूल या ठिकाणीही राजा रघुवंशी हत्या प्रकरणाप्रमाणेच एक हत्याकांड घडलं आहे. सोनमने ज्या प्रकारे राजाला हनिमूनमध्ये संपवलं तसंच ऐश्वर्याने तिच्या प्रियकरासह मिळून तिच्या पतीला संपवलं. सुपारी किलर्स सोनमच्या प्रकरणातही होते आणि या प्रकरणातही आहेत. तसंच आई आणि मुलीचा एकच प्रियकर आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
१८ मे रोजी झालं होतं तेजेश्वर आणि ऐश्वर्याचं लग्न, महिन्याभरात पतीची हत्या
ऐश्वर्याचा पती तेजेश्वर एक नर्तक होता. ऐश्वर्याने तेजेश्वरला सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायाचं आहे. ज्यानंतर १८ मे रोजी ऐश्वर्या आणि तेजेश्वर यांचं लग्न झालं. यानंतर ऐश्वर्याने तिच्या प्रियकरासह संगनमत केलं आणि सुपारी किलर्सना सुपारी देऊन त्याची हत्या घडवून आणली. तेजेश्वरची हत्या झाल्यानंतरही ऐश्वर्या तिच्या सासरीच राहात होती. आपल्यालावर संशय येऊ नये असं तिला वाटत होतं.
लग्नानंतर काही दिवसांतच पतीची हत्या
तेजेश्वरच्या कुटुंबाने १७ जून रोजी पोलिसात तक्रार केली आणि तेजेश्वर बेपत्ता झाला आहे असं सांगितलं. २१ जूनपर्यंत तेजेश्वरचा तपास सुरु होता. मात्र २१ जूनला तेजेश्वरचा मृतदेह पोलिसांना करनूल जिल्ह्यातच सापडला. तेजेश्वरच्या कुटुंबाने या प्रकरणी ऐश्वर्यावर संशय व्यक्त केला. कारण ऐश्वर्या आणि करनूलच्या बँकेत काम करणाऱ्या एकाचं अफेअर होतं हे त्यांनी ऐकलं होतं. जी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आणि पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास करण्यास सुरुवात केली ज्यानंतर तेलंगणातलं हे भयंकर हत्याकांड उघडकीस आलं.
मुलीचा आणि आईचा एकच प्रियकर, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या आणि तिची आई यांचं तिरुमल राव (ऐश्वर्याचा प्रियकर) याच्यावर प्रेम होतं. ऐश्वर्याची आई सुजाता नॉन बँकिंग कंपनीत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत होती. २०१६ मध्ये तिची ओळख तिरुमल रावशी झाली. या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसांनी सुजाता सुट्टीवर गेली. तिच्या जागी स्वच्छता कर्मचारी म्हणून ऐश्वर्या काही दिवस येत होती. त्यावेळी तिचे आणि तिरुमल रावचे प्रेमसंबंध निर्माण झाले. तेजेश्वरची हत्या करण्यासाठी या तिरुमलनेच ऐश्वर्याला मदत केली. या दोघांनी मिळून तेजेश्वरची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली. तिरुमलचं २०१९ मध्ये लग्न झालं होतं. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने त्याच्या पत्नीच्या हत्येचा कटही रचला होता.

ऐश्वर्याच्या आईला जेव्हा तिरुमलबाबत कळलं तेव्हा काय झालं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिरुमल हा आपल्या मुलीचाही प्रियकर आहे असं जेव्हा सुजाताला कळलं तेव्हा तिने ऐश्वर्या आणि तिरुमल यांना प्रेमसंबंध संपवण्यास सांगितलं. त्यानंतर ऐश्वर्याचं लग्न तिने तेजेश्वरशी लावून दिलं. तेजेश्वरला ऐश्वर्या आधीपासून ओळखत होती. पण तिने सुरुवातीला नकार दिला. त्यानंतर सुजाताने ऐश्वर्या आणि तेजेश्वर जवळ कसे येतील याकडे लक्ष दिलं. तेजेश्वर आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाची तारीखही ठरली होती. पण ऐश्वर्या घरातून निघून गेली. आई तिचा शोध घेत होती. तेजेश्वरही तिला शोधत होता. ती काही दिवसांनी परत आली आणि तिने तेजेश्वरला सांगितलं की माझ्या आईकडे आपल्या लग्नात हुंडा म्हणून देण्याचे पैसे नाहीत. पण मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे असा हट्ट तिने तेजेश्वरकडे धरला होता. तेजेश्वरच्या कुटुंबाने या लग्नाला विरोध दर्शवला होता. पण अखेर १८ मे रोजी या दोघांचं लग्न झालं.
तिरुमल राव आणि ऐश्वर्या यांचे दोन हजार फोन कॉल्स
तिरुमल राव आणि ऐश्वर्या यांचे दोन हजारांहून अधिक फोन कॉल झाले होते अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख टी श्रीनिवास यांनी दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. फेब्रुवारी ते जून या कालावधीत तिरुमल आणि ऐश्वर्या यांच्यात दोन हजारांहून अधिक फोन कॉल्सवर बोलणं झालं होतं. ऐश्वर्या आणि तेजेश्वर यांचं लग्न झालं तरीही या दोघांचे कॉल सुरु होते अशीही माहिती पोलिसांनी दिली.
तेजेश्वरची हत्या कशी करण्यात आली?
तिरुमलने तीन सुपारी किलर्सना तेजेश्वरची हत्या करण्याची सुपारी दिली. लोन च्या निमित्ताने या तिघांनी तेजेश्वरची भेट घेतली. तेजेश्वरला एका कारमध्ये या तिघांनी बसवलं. चालकाच्या शेजारच्या सीटवर तेजेश्वर बसला होता. त्यावेळी तिघांपैकी एकाने त्याचा गळा चिरला तर दुसऱ्याने त्याच्या पोटात वार केले. तिसऱ्याने डोक्यात वार केले. या हल्ल्यात तेजेश्वर ठार झाला. त्यानंतर या तिघांनी तेजेश्वरचा मृतदेह कारच्या मागच्या सीटवर ठेवला. रक्ताने माखलेले त्यांचे कपडेही त्याच कारमध्ये ठेवले. त्यानंतर ही कार एका कालव्यात ढकलून दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा त्यांना तेजेश्वरचा मृतदेह सापडला तो सडलेल्या अवस्थेत होता. त्याच्या हातावर अम्मा हे नाव गोंदलेलं होतं ज्यावरुन त्याची ओळख पटली. तिरुमल आणि ऐश्वर्या यांना असं वाटलं होतं की तेजेश्वरचा मृतदेह सापडणार नाही. त्यामुळे तो बेपत्ता झालाय हेच आपण पोलिसांना सांगत राहू. तसंच तिरुमल आणि ऐश्वर्या यांनी २० लाखांचं लोन काढलं होतं आणि लडाखला पळून जाण्याच्या बेतात होता. पण त्याचा पळून जाण्याचा त्याचा डाव अपयशी ठरला.