Telangana Doctor Absent Hospital Tragedy: लग्नाच्या सात वर्षांनंतर किर्ती आणि गणेश यांच्या आयुष्यात आनंदाची बातमी आली होती. किर्ती जुळ्या मुलांना जन्म देणार होती. पण ज्या रुग्णालयात मुलांचा जन्म होणार होता, त्याच रुग्णालयातील चुकीच्या उपचारामुळे किर्ती आणि गणेशला आपली जुळी मुले गमवावी लागली. तेलंगणाच्या इब्राहिमपट्टनम येथील एका खासगी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेवर दोन नर्सनी चुकीचे उपचार केल्यानंतर पीडित गर्भवती महिलेने जुळ्या मृत बाळांना जन्म दिला. यानंतर प्रशासनाने स्त्रीरोगतज्ज्ञ आणि दोन नर्सवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. तसेच रुग्णालयालाही टाळे ठोकले.
तेलंगणाच्या विजयालक्ष्मी रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे दोन नर्सनी डॉक्टरकडून फोनवर माहिती घेऊन गर्भवती महिलेवर उपचार सुरू केले. यामध्ये मृत मुलांचा जन्म झाल्यानंतर पीडित जोडप्याच्या कुटुंबियांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. इब्राहिमपट्टनम येथील पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम १०६ (१) आणि ३ (५) गुन्हा दाखल केला. तसेच आरोपींना अटक करण्यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेणेही सुरू आहे.
पोलीस अधिकारी जगदीश यांनी सांगितले की, रंगा रेड्डी जिल्हा वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी बी. वेंकटेश्वर राव यांच्या तक्रारीनंतर आम्ही गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींना शिक्षा देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहिल. डॉक्टर आणि दोन नर्सवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बुट्टी किर्ती (२६) आणि तिचा पती बुट्टी गणेश (३६) हे जोडपे मुल व्हावे यासाठी सात वर्षांपासून प्रयत्न करत होते. त्यांच्यावर इन विट्रो फर्टिलायझेशन उपचार सुरू होते. विजयालक्ष्मी रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. व्ही. अनुषा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली किर्तीची जानेवारी महिन्यात गर्भधारणा झाली होती.
गर्भधारणेनंतर डॉक्टरने स्कॅन केल्यानंतर जुळी मुले असल्याचे सांगितले आणि रोज घेण्याची औषधे लिहून दिली. त्यानंतर किर्ती दर महिन्यातून दोन ते तीन वेळा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जात होती. गर्भपात होण्याच्या २० दिवस आधी एप्रिल महिन्यात डॉ. रेड्डी यांनी किर्तीच्या गर्भाशयावर टाके घातले होते. यानंतर किर्तीला घरी पाठवून देण्यात आले, अशी माहिती पती गणेशने दिली.
गणेशने पुढे सांगितले की, हे टाके घातल्यानंतर किर्तीच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. रक्तस्रावही होऊ लागला. रविवारी (४ मे) पहाटे ४ वाजता गणेशने डॉ. रेड्डी यांना किर्तीच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. डॉक्टरने काही गोल्या आणि इंजेक्शन लिहून दिले. मात्र तरीही किर्तीच्या वेदना कमी झाल्या नाहीत. त्यामुळे किर्तीला विजयालक्ष्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांना धक्काच बसला. तिथे डॉ. रेडडी गैरहजर होत्या आणि दोन नर्स फोनवरून त्यांच्याकडून माहिती घेऊन किर्तीवर उपचार करत होत्या. सकाळी ९ वाजता किर्ती यांच्या वेदना वाढू लागल्या आणि रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणात होऊ लागला. काही तासांनी किर्ती यांनी दोन मृत बाळांना जन्म दिला.