अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतातील चाहता म्हणून ओळख असणाऱ्या बुसा कृष्णाचा कार्डिअ‍ॅक अरेस्टने मृत्यू झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून ट्रम्प यांची अगदी देवाप्रमाणे पुजा करणारा कृष्णा हा ट्रम्प यांना करोनाची लागण झाल्यापासून निराश होता. रविवारी कृष्णाचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृष्णाचा भाऊ बी विवेक याने इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमला दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे कृष्णाने अंघोळ करुन चहा घेतला आणि तो घराच्या बाहेर जात असतानाच जमिनीवर कोसळला. “ट्रम्प यांना करोनाची संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर तो निराश झाला होता. तो मागील काही दिवसांपासून तणावाखाली होता. तो घरामध्येच कोसळल्यानंतर आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन गेलो तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं,” असं विवेक म्हणाला.

(Bussa Krishna/Facebook)

कृष्णा मागील काही दिवसांपासून स्वत:च्या फेसबुक पेजवर अनेक व्हिडीओ पोस्ट करत होता. ट्रम्प यांच्या कुटुंबियांना लवकर बरे वाटावे अशी इच्छा व्यक्त करताना तो अनेकदा या व्हिडीओंमध्ये रडताना दिसायचा. ट्रम्प आपल्या स्वप्नात आले होते आणि त्या दिवसापासून आपण त्यांचे भक्त झाल्याचे कृष्णाने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. तेलंगणमध्ये शेती असणारा कृष्णा हा पहिल्यांदा काही वर्षांपूर्वी प्रकाश झोतात आला जेव्हा ट्रम्प यांच्या फोटोची पुजा करतानाचा त्याचा फोटो व्हायरल झाला होता. तेव्हापासून तो ‘ट्रम्प यांचा भक्त’ म्हणून स्थानिकांमध्ये लोकप्रिय झालेला. २०१९ साली १४ जून रोजी ट्रम्प यांचा वाढदिवस कृष्णाने अगदी हौसेने साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशीच त्याचे ट्रम्प यांचा सहा फुटांचा पुतळा उभारला केला. त्याने या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून त्याची पुजाही केली होती.

(Bussa Krishna/Facebook)

जनगाव तालुक्यातील कोने गावाचा रहिवाशी असलेला कृष्णाने ट्रम्प यांचा फोटो घरातील देव्हाऱ्यात ठेवलेला. रोज मी देवघरातील देवांबरोबरच ट्रम्प यांच्या फोटोचीही पुजा करतो असं कृष्णा मोठ्या अभिमानाने सांगायचा. रोज सकाळी कृष्णा ट्रम्प यांच्या फोटोला टिळा लावून, हळद-कुंकू आणि फुले वाहून त्याची पुजा करायचा. अमेरिकेमध्ये तेलंगणमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या श्रीनिवास कोचीभोतला याची २०१७ साली फेब्रुवारी महिन्यात वर्णद्वेषातून एका माजी अमेरिकन नौदल अधिकाऱ्याने हत्या केली. या घटनेनंतर कृष्णाने ट्रम्प यांची पुजा करण्यास सुरुवात केल्याचे त्याने सांगितले होते. ‘श्रीनिवासच्या हत्येसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर मला खूप दु:ख झाले. त्यावेळी भारताचे आणि भारतीयांचे महत्व ट्रम्प तसेच अमेरिकन लोकांना समजण्यासाठी त्यांना प्रेम आणि आपुलकी दाखवणे गरजेचे असल्याचे मला वाटले. तेव्हापासून मी ट्रम्प यांची पुजा करु लागलो. एक दिवस या प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहचतील अशी मला अपेक्षा आहे’, असं कृष्णा म्हणाला होता.

भारत आणि अमेरिकेतील संबंध सुधारावेत म्हणून मी ट्रम्प यांची पुजा करत असल्याचे कृष्णाने २०१९ मध्ये सांगितलं होतं. ‘मी आजपासून रोज या पुतळ्याची पुजा करणार आहे’ असं ट्रम्प यांच्या नवीन पुतळ्याबद्दल बोलताना कृष्णाने ‘एएनआय’ला सांगितलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana upset over trump contracting covid his ardent fan dies of cardiac arrest scsg
First published on: 14-10-2020 at 11:26 IST