टॉलिवूडचे दिग्दर्शक आणि यूपीएच्या काळातील माजी केंद्रीय मंत्री दसरी नारायण राव यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. दसरी राव यांना आठवड्याभरापूर्वी हैदराबादच्या केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. तीन दिवसांपूर्वीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दसरी यांनी साधारणपणे १२५ सिनेमांचे दिग्दर्शन केले. यासाठी त्यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही आले होते. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आत्मचरित्र बनवण्याची घोषणा त्यांनी केली होती. फक्त तेलगू सिनेसृष्टीमध्येच त्यांनी आपले नाणे खणखणीत वाजवले असे नाही तर राजकारणातही ते सक्रीय होते. यूपीए सरकारच्या कार्यकाळात ते केंद्रीय मंत्री होते. ते कोळसा मंत्रालयात राज्यमंत्री होते. कोळसा घोटाळा प्रकरणात त्यांच्या नावाचाही समावेश होता.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी दसरी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करणारे ट्विट केले. ते म्हणाले की, तेलगू समाज आणि सिनेमाचा एक आधारस्तंभ कोसळला आहे.