कर्नाटकमध्ये मशिदीत सापडली मंदिरासारखी रचना; खोदकाम सुरु असताना लागला शोध

कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत नूतनीकरणाचे काम थांबवावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी केले आहे.

देशात ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरु आहे. यादरम्यान कर्नाटकातील मंगळुरुच्या बाहेरील एका जुन्या मशिदीच्या खाली हिंदू मंदिरासारखी रचना सापडल्याची घटना घडली आहे. मशिदीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना या वास्तूशिल्पाचा शोध लागला आहे.

खोदकामादरम्यान सापडली वास्तू

२१ एप्रिल रोजी मंगळुरूमधील गुरुप्रा तालुक्यातील मलाली मार्केट मशिदीच्या परिसरात जुमा मशिदीच्या नूतनीकरणाचे काम सुरु होते. मशिदीचा काही भाग आधीच पाडून नूतनीकरणाचे काम मशिदीच्या अधिकाऱ्यांकडून केले जात होते. काही गटांच्या मते, मशीद बांधण्यापूर्वी या ठिकाणी मंदिर अस्तित्वात होते. कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत नूतनीकरणाचे काम थांबवावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी जिल्हा प्रशासनाला केले आहे.

हिंदू आणि मुस्लिम पक्षाकडून मागण्या

तर दुसरीकडे ज्ञानवापी मशिदीवरून वाद चांगलाच चिघळला आहे. ज्ञानवापी मशिदीच्या जागी मंदिर होते. मंदिर पाडून याठिकाणी मशीद बांधल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. हिंदू पक्षाने श्रृगांर गौरीची रोज पूजा करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच वझुखानामध्ये मिळालेल्या कथित शिवलिंगाची पूजा करण्यास अनुमती देण्यात यावी, नंदीच्या उत्तरेस असलेली भिंत तोडण्यात यावी, वझुखानामध्ये आढळलेल्या कथित शिवलिंगाची लांबी तसेच रुंदी मोजण्यासाठी सर्वेक्षण केले जावे, वझुखानाची वैकल्पिक सोय करावी, अशा मागण्या हिंदू पक्षाने आपल्या याचिकेत केल्या आहेत.

ज्ञानवापी मशिदीची वाराणसी जिल्हा न्यायाधीशांकडे सुनावणी

तर दुसरीकडे मुस्लिम पक्षानेदेखील काही मागण्या केल्या आहेत. वझुखाना बंद करण्यास मुस्लीम पक्षाने विरोध केला आहे. तसेच १९९१ अधिनियमाअंतर्गत ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण तसेच खटल्यावर या पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, ज्ञानवापी मशीद प्रकरणातील गुंतागुंत आणि संवेदनशीलता लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने, हिंदू भाविकांनी दाखल केलेला दावा शुक्रवारी दिवाणी न्यायाधीशांकडून (वरिष्ठ) काढून तो वाराणसी जिल्हा न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी हस्तांतरीत केला होता. 

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Temple architecture under old mosque karnataka mangaluru dpj

Next Story
VIDEO: “व्वा! तू हिंदी कुठे शिकलास?”, जपानी मुलाच्या तोंडून हिंदी ऐकताच मोदींकडून विचारणा, म्हणाले…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी