mob vandalises tomb in Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील अबू नगर येथे बजरंग दलासह अनेक हिंदू संघटनांचे सदस्य आणि इतर अनेक लोक एका जुन्या कबरीच्या परिसरात जमले आणि त्यांनी हे एक मंदिर असल्याचा दावा केल्याची घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर त्यांनी येथे पूजा करण्याची मागणी देखील केली. यावेळी काही आंदोलकांनी काठ्यांनी या इमारतीची तोडफोड देखील केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलील दल तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

फतेहपूर जिल्ह्याचे बजरंद दलाचे सह संयोजक धर्मेंद्र सिंह म्हणाले की, “आम्ही पूजा करण्यासाठी जात होतो आणि आम्ही पूजा करणार. प्रशासन आम्हाला रोखू शकणार नाही. पूजा करणे आमचा अधिकार आहे आणि आम्ही हिंदू धर्मात जन्माला आलो, पूजा करण्याचा अधिकार घेऊन जन्माला आलो. आमच्या अधिकारापासून आम्हाला कोणीही दूर करू शकत नाही. ते आमचे मंदिर आहे आणि जे लोक त्या मंदिराला मकबरा असल्याचे सांगत आहेत त्या लोकांचा इलाज करण्यासाठी ही गर्दी गोळा झाली आहे. आम्ही त्यांना समजावून सांगण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमचे मंदिर सोडून द्या आणि आमची वाट सोडा, जर रस्ता दिला गेला नाही तर आम्ही असे वादळ आहोत की रस्ता आपोआप बनवतो. आम्हाला कोणतेही बॅरिकेड्स रोखू शकत नाहीत.”

अबू नगरमध्ये कायदा व्यवस्थेची स्थितीवर फतेहपूरचे एसपी अनूप कुमार सिंह म्हणाले की, “आम्ही पोलीस दल तैनात केले होते आणि तयारी केली होती. काही लोकांनी दगड उचलले होते, पण त्यांच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते. सर्व लोकांनी ती जागा सोडली होती. ज्या लोकांनी कायदा हातात घेतला त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. आम्हाला याबद्दल माहिती मिळाली आहे की आंदोलकांकडून स्मारकावर हिंदू झेंडे लावण्यात आले आहेत. आता तेथे कोणताही झेंडा नाही.” दोन्ही गटांमधील लोक विखुरले गेले आणि परिस्थिती आता सामान्य आहे. १० पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी तैनात आहेत.

या प्रकरणावर जिल्हा मॅजिस्ट्रेट रवींद्र सिंह म्हणाले की, “दोन्ही पक्षांचे लोक आज येथे आले होते. काही सामाज कंटक काही अफवा पसरवत होते. जेव्हा ते तेथे आले तेव्हा त्यांना समजावून सांगण्यात आले आणि त्यांचे समाधान झाले. त्यांना आश्वासन देण्यात आले की कायदा व्यवस्था योग्य राखली जाईल. काहीही अवैध किंवा कायद्याच्या विरोधात होणार नाही. आतापर्यंत कोणाबरोबरच वाटाघाटी झालेली नाही. आमची पहिली प्राथमिकता ही कायदा- व्यावस्था सामान्य राहावी हीच आहे. “