बडगाम जिल्ह्य़ातील चट्टेरगाम येथे सोमवारी लष्कराने केलेल्या गोळीबारात दोन युवक ठार झाल्याचे तीव्र पडसाद मंगळवारी श्रीनगरमध्ये उमटून सुरक्षा दलाचे अधिकारी आणि आंदोलक तरुणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर चकमक उडाली. या तरुणांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेकही केल्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले.  
मृत युवकांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही मिनिटांतच तरुणांच्या एका गटाने कामावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या दिशेने दगडफेक केली. या तरुणांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत अश्रुधूरही सोडला परंतु तरीही उभयपक्षी तणाव कायमच होता. कायदा आणि सुव्यवस्था नीट राहावी यासाठी अधिकाऱ्यांनी लोकांच्या हालचालींवर नियंत्रणे लागू केली. नंतर तेथे काही प्रमाणात शांतता असली तरी परिस्थिती तणावपूर्ण होती. सोमवारी एका कारमधून चार युवक जात असताना सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशीसाठी रोखले होते. अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी रस्त्यावर तीन ठिकाणी उभारलेल्या अडथळ्यांना न जुमानता घालता या युवकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यामध्ये दोघेजण ठार आणि अन्य दोघेजण जखमी झाले. या प्रकरणी वस्तुस्थिती जाणण्यासाठी लष्कराने न्यायालयीन चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, राज्यातील सुरक्षा स्थिती सुधारत असताना अशा घटनांना थारा देता कामा नये, असे मत काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले. राज्यातील दहशतवादी कृत्यांना आळा बसत असताना अशा प्रकारच्या घटना घडता कामा नयेत, असे ओमर यांनी ट्विट केले.