परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
दहशतवादाचा आशियातील लोकांना ‘सर्वात गंभीर’ धोका असून; दहशतवाद आणि त्यांच्या कृत्यांना बळी पडलेले लोक यांची कधीही बरोबरी केली जाऊ नये, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी केले.
इंटरअॅक्शन अँड कॉन्फिडन्स बिल्डिंग मेझर्स इन एशिया (सीआयसीए) सदस्य दहशतवादाचे बळी ठरले आहेत, असे ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे होत असलेल्या या संघटनेच्या परिषदेत जयशंकर म्हणाले.
आशियात आमच्यासमोरील सर्वात मोठा धोका दहशतवादाचा आहे. सीआयसीएचे सदस्य त्याचे बळी आहेत आणि त्यामुळे, दहशतवादी व त्यांचे बळी यांना कधीही समान पातळीवर लेखू नये, असे ट्वीट जयशंकर यांनी केले.
किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथील एससीओ परिषदेत केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या, मदत करणाऱ्या आणि निधी पुरवणाऱ्या देशांवर कडाडून टीका करतानाच अशा देशांना जबाबदार ठरवले जायला हवे, असे पाकिस्तानचा उल्लेख न करता म्हटले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी जयशंकर यांनी हे वक्तव्य केले आहे.
सीआयसीए हे आशियाई देशांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी आणि या क्षेत्रात शांतता, सुरक्षितता व स्थैर्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेले आशियास्तरीय व्यासपीठ आहे. या परिषदेपूर्वी ताजिकिस्तानचे अध्यक्ष इमोमाली रहमोन यांनी जयशंकर यांचे स्वागत केले.
द्विपक्षीय चर्चा सुरू करण्याचा निर्णय भारतावर अवलंबून- कुरेशी
पाकिस्तान भारताशी समानतेच्या आधारावर सन्मानपूर्वक चर्चा करू इच्छितो. प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू करायची की नाही हे भारताने ठरवायचे आहे असे मत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी व्यक्त केले आहे.
कुरेशी हे किरगिझस्तानात १९ व्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी गेले असताना त्यांनी सांगितले की, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान व भारताचे समपदस्थ नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी या बैठकीच्या निमित्ताने चर्चा केली नाही.
कुरेशी यांनी जिओ न्यूज ला सांगितले की, दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करून स्मितहास्य केले. भारत सरकारने मते राखण्यासाठी केवळ निवडणूक मनोवृत्तीचा अवलंब केला आहे. पाकिस्तानशी चर्चा सुरू करायची की नाही याचा निर्णय भारताने घ्यायचा आहे. आम्हाला त्याची घाई नाही किंवा आमच्या त्याबाबत काही अडचणी नाहीत. जर भारताची तयारी झाली तर ही चर्चा होईल पण ती समानतेच्या आधारवर सन्मानपूर्वक झाली पाहिजे. आम्ही कुणाच्या मागे पळणार नाही.