जमात उद दवाचा प्रमुख असलेला हाफिझ सईद याच्या ‘तेहरीक ए आझादी जम्मू अँड काश्मीर’ (टीएजेके)या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय दबावामुळे बंदी घातली असून त्याचा फार गाजावाजा केला नाही. आता त्याच्या या संघटनेला होणारा अर्थपुरवठा व त्याच्या कारवायांवर नियंत्रणे येऊ शकतात. तेहरीक ए आजादी जम्मू अँड काश्मीर या संघटनेला जमात उद दवामुळे विशेष महत्त्व आले होते. त्यांनी काश्मीर स्वातंत्र्यासाठी मेळावे घेऊन फलक लावले होते.

५ फेब्रुवारीला काश्मीर दिन साजरा करताना सगळ्या पाकिस्तानात त्यांनी बॅनर्स लावले होते. त्यापूर्वी सईद याला लाहोर येथे ९० दिवस नजरकै देत ठेवण्यात आले होते. मुंबईतील २००८च्या हल्ल्याचा सूत्रधार असलेला सईद याने त्याला नजरकैदेत ठेवण्यापूर्वीच जम्मू काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी टीएजेके ही संघटना स्थापन करणार असल्याचे सूतोवाच केले होते.

सईद याला नदरकैदेची कुणकुण आधीच लागली होती. जमात उद दवा व फलाह ए इन्सानियत फाऊंडेशन या संघटनांवर कारवाई होईल हे माहिती असल्याने त्याने तिसरी संघटना स्थापन केली होती. स्पेनच्या आर्थिक कारवाई गटाने ८ जूनला ज्या दहशतवादी संघटनांची यादी जाहीर केली होती त्यात टीएजेकेचा उल्लेख आहे. त्यानंतर जमात उद दवाची सोमवारी बैठक झाली व त्यात टीएजेकेवरील बंदीची चर्चा झाली. या यादीत एकूण ६४ संघटनांचा समावेश असून त्यात जैश ए महंमद, अल कैदा, लष्कर ए तोयबा यांचा उल्लेख आहे. भारतात हल्ले करणाऱ्या अनेक संघटनांचा त्यात समावेश आहे. पाकिस्तान स्पेनमधील या संस्थेच्या रडारवर असून संयुक्त राष्ट्रांनी घालून दिलेले नियम पाळत नसल्याचे लक्षात आले आहे.

दहशतवाद्यांना अर्थपुरवठय़ाचा प्रश्न भारताने फेब्रुवारीत उपस्थित केला होता. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत भारताने अस्ताना येथे दहशतवाद्यांना अर्थपुरवठय़ाचा प्रश्न उपस्थित केला पण त्याआधीच टीएजेकेवर बंदी घालण्यात आली होती. गेल्या आठवडय़ात अमेरिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवेळी हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीन याला जागतिक दहशतवादी घोषित केले होते.