scorecardresearch

काश्मीरमधील चकमकीत ४ दहशतवादी ठार

शोपियाँ जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ४ दहशतवादी ठार झाले; तर या चकमकीच्या ठिकाणी जाताना वाहनाला अपघात झाल्याने लष्कराचे दोन जवान शहीद झाले.

श्रीनगर : जम्मू- काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ४ दहशतवादी ठार झाले; तर या चकमकीच्या ठिकाणी जाताना वाहनाला अपघात झाल्याने लष्कराचे दोन जवान शहीद झाले.  शोपियाँच्या झैनपुरा भागातील बडिगाम येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घालून तेथे शोधमोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात ४ दहशतवादी मारले गेले. त्यांची ओळख अद्याप पटली नसून ते कोणत्या गटाचे होते हेही स्पष्ट झालेले नाही.  या चकमकीबाबत माहिती मिळाल्यानंतर ४४ राष्ट्रीय रायफल्सचे एक लष्करी पथक सुमो वाहनातून तिकडे निघाले होते. चौगामनजीक हे वाहन उलटल्याने २ जवान मरण पावले, तर दोघे जखमी झाले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Terrorists killed kashmir clashes security forces encounter young martyrs ysh