Tesla Entry in Indian Market with Showroom in Mumbai : इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील जागतिक बाजारातील दिग्गज कंपनी टेस्लाने मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात त्यांचं पहिलं अनुभूती केंद्र (एक्सपीरियन्स सेंटर) खुलं केलं आहे. आज (१५ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्लाच्या एक्सपीरियन्स सेंटरचं उद्घाटन केलं. यासह बहुप्रतीक्षित टेस्ला कंपनी अधिकृतपणे भारतीय बाजारात दाखल झाली आहे. आता मुंबईसह भारतातील रस्त्यांवर टेस्लाच्या गाड्या धावताना दिसतील.

या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “टेस्लाचं मुंबईतील एक्सपीरियन्स सेंटर सुरू झालं आहे. दुसऱ्या ठिकाणी लॉजिस्टिक सेंटर असेल. ते आता संपूर्ण मेकॅनिझम व सर्व्हिस सेंटर मुंबईत सुरू करत आहेत. टेस्लाच्या गाड्यांचं बूकिंग मुंबईतील सेंटरपासून सुरू होतंय. तसेच टेस्ला कार मुंबईत विकली जाणार आहे ही मुंबईसाठी आनंदाची गोष्ट आहे. जगातील सर्वात स्मार्ट कार, जिची आपण वाट पाहोत होतो ती आता भारतात दाखल झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांची संपूर्ण इकोसिस्टिम आयात केली जाईल, भविष्यात ते भारतातही इकोसिस्टिम उभारू शकतात.

टेस्लाच्या कारची किंमती किती असेल?

टेस्लाने पहिल्या टप्प्यात भारतात त्यांची मॉडेल वाय ही कार लॉन्च केली आहे. या कारची ऑन रोड किंमत ६१ लाख रुपये इतकी असेल. या कारच्या रिअर-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटसाठी ग्राहकांना ५९.८९ लाख रुपये मोजावे लागतील, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे.

कुठे आहे टेस्लाचं शोरूम?

भारत सरकारने टेस्लाला भारतात इलेक्ट्रिक कार्स तयार करण्यास सुचवलं होतं. मात्र, कंपनीला भारतात कार्स तयार करण्यात रस नाही, कंपनीला देशात केवळ विक्री करायची आहे. त्यामुळे कंपनीने मुंबईत विक्री दालन स्थापन केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही टेस्लाने आयात शुल्क टाळण्यासाठी भारतात मोटार निर्मिती प्रकल्प उभारला तर ते अमेरिकेसाठी अन्याय्य ठरेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर टेस्ला इंडियाने मुंबईतील लोढा लॉजिस्टिक्स पार्कमध्ये २४,५६५ चौरस फूट क्षेत्रफळाची जागा गोदामासाठी पाच वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे. कंपनीने आता वांद्रे कुर्ला संकुलातील मेकर मॅक्सिटी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये आपलं अनुभूती केंद्र सुरू केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टेस्ला भारतात त्यांचं लोकप्रिय ‘मॉडेल वाय’ विकणार आहे. यासाठी शो रूमव्यतिरिक्त, कंपनीने साकीनाका परिसरातील कुजुपाडा येथे असलेल्या लोढा लॉजिस्टिक्स पार्कमध्ये सेवा केंद्र आणि गोदाम उभारलं आहे.