Thailand-Combodia dispute : थायलंड आणि कंबोडियामधील सीमावाद आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले करण्यात येत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही देशांत सीमारेषेवरून हा संघर्ष निर्माण झालेला आहे. या दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी सध्या दोन्ही देशातील तणाव निवाळलेला नाही. त्यामुळे थायलंड आणि कंबोडियाला जाणाऱ्या नागरिकांसाठी आता भारत सरकारने महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

थायलंडमधील भारतीय दूतावासाने शुक्रवारी भारतीय नागरिकांना थायलंडच्या सात प्रांतांमध्ये प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशातील सीमा भागात संघर्षांची तीव्रता वाढल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भारतीय दूतावासाने या संदर्भात एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे.

निवेदनात म्हटलं आहे की, थायलंडमधील उबोन रत्चाथानी, सुरिन, सिसाकेट, बुरीराम, सा काओ, चंथाबुरी यासह २० हून अधिक ठिकाणी प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच थायलंड आणि कंबोडिया सीमेजवळील परिस्थिती लक्षात घेता थायलंडला जाणाऱ्या सर्व भारतीय प्रवाशांना अधिकृत स्रोतांकडून अपडेट्स तपासण्याचा सल्ला दूतावासाने निवेदनात दिला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, दोन्ही देशांच्या सीमेवर गुरुवारी मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला. यामध्ये किमान १६ लोक मृत्युमुखी पडले असून अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मुले आणि एका सैनिकाचाही समावेश आहे. तसेच या संघर्षामुळे हजारो लोकांना त्यांची घरे सोडून दुसरीकडे तात्पुरतं स्थलांतर करावं लागलं आहे. थायलंडने कंबोडियन भूभागावर हवाई हल्ले केले असून शुक्रवारीही थाई सैन्याने चार सीमावर्ती प्रांतांमध्ये अनेक ठिकाणी गोळीबार केल्याचं सांगितलं जातं.

थायलंड आणि कंबोडियामधील सीमावाद नेमका काय आहे?

थायलंड आणि कंबोडियामध्ये ८१७ किलोमीटर लांबीची सीमा आहे. १८६३ ते १९५३ या काळात फ्रेंच वसाहतवादी अधिकाऱ्यांनी कंबोडियावर ताबा मिळवताना त्याच्या बर्‍याचशा भागांवर ऐतिहासिकदृष्ट्या नियंत्रण प्रस्थापित केले होते. आधी या दोन्ही देशांमधील संबंध चांगले होते. परंतु काही दिवसांपासून ता मोआन थॉम आणि ता मुएन थॉम हा भाग वादाचा विषय ठरला आहे. १९०७ मध्ये काढलेला हा नकाशा थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील नैसर्गिक पाणलोट रेषेचे अनुसरण करण्याच्या करारावर आधारित होता. मात्र, नंतर थायलंडने ११ व्या शतकातील प्रीह विहियर मंदिर आपल्या नकाशात डांगरेक पर्वतरांगांमध्ये दर्शविल्यामुळे कंबोडियाने तीव्र निषेध व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युनेस्कोच्या मते, शंकराला अर्पण केलेले हे मंदिर कंबोडियन मैदानावर वर्चस्व असणाऱ्या पठाराच्या कडेला वसलेले आहे. २००८ मध्ये कंबोडियाने प्रीह विहियर मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा देण्याची मागणी केली तेव्हा तणाव निर्माण झाला होता, असे टाइम्स ऑफ इंडियाने एका वृत्तात म्हटलं आहे. जुलै २००८ मध्ये मंदिराला मान्यता दिल्यानंतर, सीमावर्ती भागात कंबोडियन आणि थाई सैन्यात लष्करी संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष वर्षानुवर्षे सुरू राहिला आणि एप्रिल २०११ मध्ये तो शिगेला पोहोचला. त्यामुळे ३६,००० लोक विस्थापित झाले. त्याच वेळी १९६२ च्या निर्णयाला मान्यता मिळावी यासाठी कंबोडिया पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला. न्यायालयाने दोन वर्षांनंतर आपल्या आधीच्या निर्णयाचे समर्थन केले. हा निर्णय थायलंड आजही मनापासून स्वीकारू शकलेला नाही.