Sanjay Raut देशाची राजधानी दिल्लीत ध्वजारोहण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. आज १२ व्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केलं. मोदी म्हणाले, स्वातंत्र्याचं हे पर्व १४० कोटी लोकांच्या गौरवाचं पर्व आहे. प्रत्येक मनात आशा आणि अपेक्षा आहेत. देश एकतेच्या भावनेला निरंतर बळकट करतो आहे. १४० कोटी देशवासी आज तिरंग्याच्या रंगात रंगले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसंच त्यांनी या भाषणात महत्त्वाची घोषणा केली. तसंच त्यांनी स्वदेशाचा नाराही दिला. दरम्यान संजय राऊत यांनी मोदींच्या भाषणावर जोरदार टीका केली आहे. स्वदेशीचा नारा ही काँग्रेसची देणगी आहे असं राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत काय म्हणाले?

“भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होतो आहे. पण देशात भूक, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था यांच्या गंभीर समस्या आहेत. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. मोदी आता ७५ वर्षांचे होतील, देशाचं स्वातंत्र्य ७९ वर्षांचं झालं. या सगळ्या कालावधीत देश प्रगतीपथावर गेला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा एक सुई आणि धागाही बनत नव्हता. आज तो देश अनेक बाबतीत पुढे गेला. त्याचं श्रेय देशाचं नेतृत्व करणाऱ्यांना सर्व नेत्यांना जातं. काही लोकांना वाटतं की २०१४ नंतरच देश स्वतंत्र झाला, पण २०१४ नंतर देश खड्ड्यात गेला. याबाबत चर्चा न करता आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊ. या देशातले अनेक पीडित, आदिवासी आणि इतर घटक यांनी स्वातंत्र्याचा सूर्य अजून पाहिलेला नाही. त्यांच्या पर्यंत स्वातंत्र्याची किरणं जावीत या शुभेच्छा आपण देऊ.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भारताने धार्मिक देशाला धर्मांध बनवलं

प्रत्येक पंतप्रधानांनी काही ना काही योगदान दिलं आहे. भाजपाचं योगदान इतकंच आहे मागच्या दहा वर्षात की आपला देश धार्मिक होता तो त्यांनी धर्मांध केला. आपला देश धार्मिक होता, आपण भारतवर्ष असं म्हणतो. श्रद्धाळू आणि धार्मिक देशाला भाजपाने धर्मांध केलं. ही धर्मांधता भारतात जातीय फूट पाडते आहे आणि ती देशाच्या स्वातंत्र्याला धोकादायक आहे. असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

स्वदेशीचा नारा काँग्रेस पक्षाची देणगी आहे-राऊत

स्वदेशीचा नारा मोदींनी दिला पण हा नारा काँग्रेस पक्षाची देणगी आहे. स्वदेशीचा नारा स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतर काँग्रेसने दिला त्यामुळेच खादी आली. मोदी आज काँग्रेसवादी, नेहरुवादी आणि गांधीवादी झाली. एक दिवस मोदी गांधी टोपी घालूनही भाषण करतील. मोदींनी आज ट्रम्प यांना इशारा वगैरे काही दिलेला नाही. कारण त्यांनी कुणाचं नाव घेऊन कुणाला इशारा देत नाहीत. ट्रम्पचं नाव घ्या, देशाचं शत्रूचं घ्या. ट्रम्प रोज शिव्या देत आहेत त्यांचं नाव घ्यायला लाजताय कशाला? पाकिस्तानला इशारा दिला तसा चीनलाही इशारा द्या असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुनीरच्या मागे ट्रम्प आहेत हे मोदी कसं विसरतात? मोदींनी लाल किल्ल्यावरुन खोटी भाषणं देऊ नयेत. पाकिस्तानच्या मागे चीन आहे, त्यामुळे चीनला दम दिला पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले.