नवी दिल्ली, पीटीआय : ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारीत देशातील किरकोळ महागाई दराने चिंताजनक पातळी कायम राखली. सरलेल्या जूनमध्ये हा दर ७.०१ टक्के नोंदविला गेल्याचे मंगळवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. मे महिन्यांतील ७.०४ टक्क्यांच्या तुलनेत महागाई दरात फार मोठा बदल दिसून आलेला नसून, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने भीतीदायी सहा टक्के अथवा अधिक पातळीवर हा दर राहण्याचा हा सलग सहावा महिना आहे.

 केंद्रीय सांख्यिकी आणि योजना अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, किरकोळ महागाई दराची एप्रिल ते जून २०२२ या तिमाहीतील सरासरी ही ७.३ टक्के अशी राहिली, जी रिझव्‍‌र्ह बँकेने अंदाजलेल्या ७.५ टक्क्यांच्या सरासरीच्या तुलनेत, २० आधार बिंदूंनी कमी राहिली. तथापि हा दर २ ते ६ टक्क्यांच्या सहनशीलता पातळीत राखण्याची जबाबदारी रिझव्‍‌र्ह बँकेवर असून, गंभीर बाब म्हणजे या सहनशील मर्यादेचा मध्य म्हणजेच ४ टक्क्यांपेक्षा अधिक महागाई दर राहण्याचा हा सलग ३३ वा महिना आहे.

भाज्या आणि डाळींच्या किमती काहीशा उतरल्याने मे महिन्याच्या तुलनेत जूनचे महागाई दराचे आकडे किंचित घसरल्याचे दिसतात. अन्नधान्यातील महागाई दर जूनमध्ये ७.७५ टक्के होता, जो मे महिन्यात ७.९७ टक्क्यांवर होता, असे ‘एनएसओ’ची आकडेवारी दर्शविते. यामध्ये भाजीपाल्यातील महागाई दर मेमधील १८.२६ टक्क्यांवरून १७.३७ टक्के असा खाली आला. त्या उलट कडधान्यांच्या किमती आधीच्या महिन्यांतील ५.३३ टक्क्यांवरून ५.६६ टक्के, इंधन व वीज वर्गवारीतील महागाई ९.५४ टक्क्यांवरून १०.३९ टक्क्यांपर्यंत आणि फळांमधील किंमती वाढण्याचा दर २.३३ टक्क्यांवरून जूनमध्ये ३.१० टक्क्यांपर्यंत कडाडल्याचे दिसून आले.

ऑगस्टमध्ये व्याजदरात वाढ अटळ..

जूनमधील ७.०१ टक्क्यांचा दर पाहता, रिझव्‍‌र्ह बँकेकडून ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात होत असलेल्या द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीत व्याजदरात वाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. महागाईला काबूत ठेवण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने मे महिन्यांपासून दोनदा एकूण ९० आधारिबदूंनी (०.९० टक्के) व्याजदर वाढविले आहेत.

सीएनजी, पीएनजीच्या दरांत वाढ

‘महानगर गॅस’कडून सीनजी आणि पीएनजीच्या दरांत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीएनजी चार रुपयांनी तर पीएनजी तीन रुपयांनी वाढवण्यात आले आहे. या दरवाढीमुळे पीएनजीचा नवा दर ४८.५० रुपये, तर सीएनजीचा दर ८० रुपये प्रति किलो होणार आहे, अशी माहिती ‘महानगर’कडून देण्यात आली. ही दरवाढ मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली.

औद्योगिक उत्पादन दराची मात्र उभारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादन वाढीचे प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने (आयआयपी) सरलेल्या मे महिन्यामध्ये १९.६ टक्क्यांपुढे मजल मारल्याचे मंगळवारी प्रसिद्ध आकडेवारीतून स्पष्ट झाले. देशाच्या उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक मानला जाणाऱ्या या निर्देशांकाने चालू वर्षांत नोंदविलेली ही सर्वोच्च नोंद आहे.