नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला नवी ओळख मिळाली असून बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ हे नवे पक्षनाव बहाल केले. आता शरद पवार गटाला या नव्या पक्षनावावर राज्यसभेची आगामी निवडणूक लढवता येईल. या सर्व प्रकरणावर शरद पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे अजित पवार गट हाच मूळ पक्ष असल्याचा निकाल देत ‘घडय़ाळ’ हे निवडणूक चिन्ह वापरण्याची मुभा दिली. आयोगाने शरद पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस व घडय़ाळावरील हक्क फेटाळताना नव्या पक्षनावांसाठी बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत तीन पर्याय सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार शरद पवार गटाच्या वतीने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदराव पवार’ व ‘एनसीपी-शरद पवार’ अशा तीन नावांचे पर्याय सादर करण्यात आले होते. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्काळ निर्णय देत पहिला पर्याय स्वीकारला. २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेची निवडणूक होणार असून शरद पवार गटाला नव्या पक्षनावावर उमेदवार उभे करता येतील, असे आयोगाने शरद पवार यांना बुधवारी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. राज्यसभेसाठी मतांचा प्राधान्यक्रम महत्त्वाचा असतो. लोकसभा निवडणुकीसाठी मात्र नव्या निवडणूक चिन्हाची गरज भासेल. आयोगाने चिन्हाबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. यासंदर्भात चहाचा कप, उगवता सूर्य, सूर्यफूल, वटवृक्ष आदी चिन्हांचा विचार केला गेल्याचे समजते.
हेही वाचा >>>राज्यसभेतील मोदींच्या भाषणावर मल्लिकार्जुन खरगेंचं चोख प्रत्युत्तर; सांगितला NDA चा फुल फॉर्म!
१९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. मात्र, अजित पवार यांच्यासह पक्षातील नेते सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट)- भाजप युतीमध्ये सामील झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले. अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यानंतर झालेल्या दहा सुनावण्यानंतर आयोगाने अजित पवार गट हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्वाळा मंगळवारी दिला. त्यापूर्वी शिवसेनेच्या फुटीवरही विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे शिंदे गटाला शिवसेना हे पक्षनाव व धनुष्य-बाण हे निवडणूक चिन्ह बहाल केले होते. शिवसेनाप्रकरणाचा कित्ता राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भातील निर्णयाबाबतही गिरवला गेल्याचे शरद पवार गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसवरील हक्क गमावल्यानंतर बुधवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. बैठकीत शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, खासदार श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण, फौजिया खान, महम्मद फैजल आदी नेते उपस्थित होते. बैठकीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे तसेच अन्य खासदार संसदेच्या कामकाजामध्ये सहभागी झाले. त्यानंतर शरद पवार विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमाला हजर राहिले. या कार्यक्रमातही त्यांनी आयोगाच्या निर्णयावर भाष्य करणे टाळले.
हेही वाचा >>>“पांडवांनी पाच गावे मागितली होती, आम्ही तर…”, योगी आदित्यनाथ यांची विधानसभेत तुफान फटकेबाजी
कायदेशीर पर्यायांची चाचपणी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी बुधवारी कायदेशीर पर्यायांची चाचपणी करण्यात आली. यासंदर्भात ज्येष्ठ वकील कपिल सिबल, अभिषेक मनु सिंघवी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे समजते.
शरद पवार यांना राजकीयदृष्टय़ा संपवण्याचा कट रचला जात आहे. हा कुटील डाव राज्यातील जनतेला उलगडून दाखवण्याची गरज आहे. आयोगाने निकालात आम्ही दिलेल्या कागदपत्रांचा उल्लेखही केलेला नाही. – जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)