मात्र हा देशांतर्गत प्रश्न असल्याचाही खुलासा

पीटीआय, वॉशिंग्टन डी. सी.

भारताची लोकशाही ही जगाच्या भल्यासाठी असून ती कोसळली तर त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होतील, असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला. येथील प्रतिष्ठित नॅशनल प्रेस क्लबमध्ये राहुल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अनेक मुद्दय़ांवर मतप्रदर्शन केले. मात्र, देशातील लोकशाही वाचवणे हा आमचा देशांतर्गत प्रश्न आहे, असा खुलासाही त्यांनी त्याच प्रश्नाच्या उत्तरामध्ये केला.

राहुल म्हणाले की, भारतातील लोकशाहीसाठी लढा देणे हे आमचे काम आहे, हा आमचा मुद्दा आहे. ही गोष्ट आम्हाला समजते, ती आम्ही स्वीकारली आहे आणि त्यावर आम्ही काम करत आहोत. मात्र, लक्षात ठेवण्याची बाब अशी की, भारतीय लोकशाही ही जगाच्या भल्यासाठी आहे. कारण भारत हा मोठा देश आहे. भारतातील लोकशाही कोसळली तर त्याचा जगावर परिणाम होईल. त्यामुळे भारतीय लोकशाहीला किती महत्त्व द्यायचे याचा विचार तुम्ही करायचा आहे. पण आमच्यासाठी हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. या लढाईला आम्ही समर्पित आहोत आणि आम्ही त्यामध्ये जिंकणार आहोत.
राहुल यांनी मार्च महिन्यात केलेल्या ब्रिटन दौऱ्यात भारतातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यावरून देशात वादंग उठले होते. त्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी प्रश्नाचे उत्तर देताना वादाला जागा राहणार नाही याची खबरदारी घेतली.

भाजपच्या पराभवाचे भाकीत

आगामी तीन-चार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा काँग्रेसकडून सफाया होईल, असा दावा राहुल यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आणि भारतीय वंशाचे प्रतिष्ठित अमेरिकी नागरिक फ्रँक इस्लाम यांनी आयोजित केलेल्या स्वागताच्या कार्यक्रमात केला. तसेच देशात विरोधकांची एकजूट होत असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला ‘आश्चर्यकारक’ निकाल पाहायला मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुस्लीम लीगच्या धर्मनिरपेक्षतेवरून वाद!

केरळमध्ये काँग्रेसबरोबर युती असलेला इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययूएमएल) हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे असे राहुल गांधी एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले. त्यावरून भाजपने राहुल यांना लक्ष्य केले. केरळमधील आययूएमएल हा पक्ष मोहम्मद अली जिनांच्या ऑल इंडिया मुस्लीम लीगच्याच मानसिकतेने काम करतो. राहुल गांधी आणि काँग्रेसला हिंदू दहशतवाद दिसतो पण मुस्लीम लीग धर्मनिरपेक्ष वाटतो अशी टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.

भारतात लोकशाहीची पुनर्रचना करणे हे सोपे काम असणार नाही, अवघड असेल. त्याला वेळ लागेल. मात्र भाजपचा पराभव करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गोष्टी आमच्याकडे आहेत, याविषयी आम्हाला संपूर्ण खात्री आहे.-राहुल गांधी, काँग्रेसचे नेते