सरदार वल्लभभाई पटेल नसते, तर आज हैदराबादमध्ये जाण्यास पाकिस्तानचा व्हिसा लागला असता, असे वक्तव्य भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी गुलबर्गामध्ये झालेल्या जाहीर सभेत केले.
मोदी म्हणाले, पाकिस्तानला खरा धडा सरदार वल्लभभाई पटेल यांनी शिकवला. ते नसते, तर आज हैदराबादमध्ये जाण्यास पाकिस्तानी व्हिसा लागला असता. कॉंग्रेसमुळे नाही तर ज्या लोकांनी तेलंगणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांच्यामुळेच तेलंगणा राज्याची निर्मिती झाली. भाजपही स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या बाजुनेच आहे. परंतु, ज्यारितीने काँग्रेसने मतांचे राजकारण करण्यासाठी सीमांध्रवर अत्याचार केला, ते योग्य नाही. देशाचे विभाजन करणाऱया काँग्रेसला देशातील जनताच धडा शिकवेल, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
आंध्र प्रदेशचे काँग्रेस सरकारने विभाजन केले खरे परंतु बाळाला जन्म देऊन आईची हत्या करावी, असे काम काँग्रेसने तेलंगणाचे केले असल्याचेही मोदी म्हणाले. काँग्रेसने आजवर फक्त मतांचे राजकारण, भ्रष्टाचार आणि विभाजनाचे राजकारण याशिवाय काहीच केले नाही. त्यांच्या पापाच घडा आता भरला आहे. यावेळी काँग्रेसला हाणून पाडण्यासाठी जनता मतदान करेल, असेही मोदींनी स्पष्ट केले.