Tamil Nadu: सध्याच्या काळात अनेक वेगवेगळ्या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये कधी एखाद्या कार्यक्रमात नाचताना एखाद्याला हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो तर कधी अपघाताच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो. आता अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका बस चालकाला बस चालवताना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. मात्र, कंडक्टरने प्रसंगावधान दाखवल्यामुळे बसमधील तब्बल ४० प्रवाशांचा जीव वाचला आहे.
नेमकं काय घडलं?
तामिळनाडूमधील दिंडीगुल जिल्ह्यात शुक्रवारी एका बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. पण प्रवाशांच्या आणि कंडक्टरच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. बस चालकाचे नाव प्रभू असं असून त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. बसमधील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही सर्व घटना कैद झाली आहे.
व्हिडीओमध्ये कंडक्टर आणि प्रवासी चालकाला मदत करण्यासाठी धावल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, हृदयविकाराचा झटका आल्यामुळे चालक बेशुद्ध पडल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटताच प्रवाशांनी चालकाची मदत केली आणि कंडक्टरने वेळीच तपर्ता दाखवत बसचं ब्रेक दाबल्याने बस थांबली आणि ४० प्रवाशांचा जीव वाचला. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
ही बस पुडुकोट्टईकडे जाणारी होती. बस कनकमपट्टी ओलांडत असताना चालकाने कंडक्टरला फोन केला आणि छातीत तीव्र वेदना होत असल्याचं सांगितलं. परंतु कंडक्टरकडून कोणीही प्रतिक्रिया येण्याआधीच बस चालक बेशुद्ध झाला. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. मात्र, बसवरील नियंत्रण सुटल्याचं पाहून कंडक्टरने धाव घेत तात्काळ बस थांबवली आणि अपघात टळला. दरम्यान, आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच बसमधून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणीसह कंडक्टर आणि प्रवाशांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सांगितली जात आहे.
याआधीही घडल्या होत्या अशा घटना
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अशाच एका घटनेत बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या चालकाचे बस चालवताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली होती. ३९ वर्षीय किरण नेलमंगला ते यशवंतपूर बस चालवत असताना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवल्या आणि बेशुद्ध पडल्याची घटना घडली होती. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशातील बदायूं येथे लग्नाच्या एक दिवस आधी हळदी समारंभात एका २२ वर्षीय वधूचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती.