अभिनेता अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमा अडचणींमध्ये सापडण्याची चिन्हं आहेत. कारण हिंदू सेनेने लक्ष्मी बॉम्ब सिनेमातील कलाकार, दिग्दर्शक यांच्याविरोधात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून या सिनेमाला विरोध दर्शवला आहे. या सिनेमातून देवीचा अपमान केला जातो आहे… तसंच लव्ह जिहादला या सिनेमात प्रोत्साहन देण्यात येते आहे. त्यामुळे आम्ही सांगितलेले बदल केले नाही तर हा सिनेमा संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही असं हिंदू सेनेने म्हटलं आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिलं आहे.

 

 

राघव लॉरेन्स दिग्दर्शित सिनेमात देवी लक्ष्मीच्या नावाचा वापर करुन हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत अशीही तक्रार करण्यात आली आहे. तसंच या सिनेमातून लव्ह जिहादला उत्तेजन दिलं जातं आहे असाही दावा हिंदू सेनेने केला आहे. जोपर्यंत आम्ही सांगितलेले बदल होणार नाहीत तोपर्यंत देशात कुठेही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी दिला आहे. या सिनेमात अक्षय कुमारने आसिफ नावाची भूमिका केली आहे तर कियारा अडवाणी या अभिनेत्रीने पूजा हे पात्र साकारलं आहे. या सिनेमात आसिफचे पूजावर प्रेम असते असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या सिनेमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचा नेटकऱ्यांचा समज झाला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनीही या सिनेमासह अक्षय कुमारला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.