आता लवकरच भारतात निर्माण केलेल्या विमानातून हवाई सफर करता येणार आहे. नागरी उड्डाण महासंचालनालयने (डीजीसीए) हिंदुस्तान ऍरोनॉटिक्स लि. (एचएएल) द्वारा निर्मित डॉर्नियर २२८ विमानाच्या व्यापारी उपयोगास मंजुरी दिली आहे. १९ आसनसंख्या असलेल्या या विमानाचा आतापर्यंत फक्त संरक्षण क्षेत्रातच वापर केला जात होता. हे भारताचे पहिले स्वदेशी विमान असेल ज्याचा उपयोग व्यापारी उपयोगासाठी केला जाईल.

डीजीसीएने याला प्रमाणपत्र दिले आहे. त्याचबरेाबर एचएएलच्या डॉर्नियर २२८ ला पात्रता प्रमाणपत्रही दिले आहे. आता एचएएल भारतात विमान कंपन्यांना आपले विमान विकू शकते. याचा उपयोग मोदी सरकारची महत्वकांक्षी ‘उडान’ योजनेंतर्गत केला जाऊ शकतो. या विमानाचा उपयोग करण्यासाठी विशेष प्रोत्साहन दिले जाऊ शकते, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एचएएल नागरी वापरासाठी हे विमान नेपाळ आणि श्रीलंकासारख्या देशांनाही विकू शकते. अत्याधुनिक विविधता असलेले बहुउद्देशीय १९ आसनी हलके विमान अशी डॉर्नियर २२८ ची एचएएलने व्याख्या केली आहे. हे विमान ४२८ किमी प्रति तास वेगाने उडू शकते. याची क्षमता ७०० किमी इतकी असेल. रात्री उड्डाण करण्यासही विमान सक्षम आहे. याच महिन्यात कानपूर विमानतळावरून या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले होते. त्यानंतर डीजीसीएने याच्या व्यापारी उपयोगास मंजुरी दिली.