एपी, सियान्जूर (इंडोनेशिया) : इंडोनेशियाच्या जावा बेटावर सोमवारी झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या मंगळवारी २६८ वर पोहोचली. या भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली आणखी मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या वाढली. अद्याप १५१ नागरिक बेपत्ता असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाने दिली.

आपत्ती निवारण विभागाचे प्रमुख सुहरयतो यांनी पत्रकारांना सांगितले, की सियान्जूर शहराजवळ सोमवारी दुपारी झालेल्या ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात एक हजार ८३ नागरिक जखमी झाले आहेत.  तीनशेहून अधिक नागरिक गंभीर जखमी झाल्याची अधिकाऱ्यांनी नोंद केली आहे. सुमारे सहाशे नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सियान्जूरच्या वायव्येकडील सिजेदिल गावात भूकंपामुळे भूस्खलन झाले. अनेक ठिकाणी घरे गाडली गेली, असे राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेचे प्रमुख हेन्री अल्फियांदी यांनी सांगितले. ते म्हणाले, की जीवितहानीची शक्यता असलेल्या ठिकाणी बचावकार्याच्या मोहिमा वाढवत आहोत.