पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या काळात हिंसाचाराची शक्यता : भाजपा

पश्चिम बंगालला अतिसंवेदनशील राज्य घोषित करावं, अशी मागणीही भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

निवडणुकांच्या काळात पश्चिम बंगालमध्ये कायमच हिंसाराच्या घटना घडतात. नुकत्याच इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पंचायत निवडणुकांमध्ये झालेल्या हिंसाचारात १०० लोकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या काळातही इथे हिंसाचाराची शक्यता आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने या राज्याला अतिसंवेदनशील राज्य म्हणून घोषित करावं, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केली आहे.

आम्हाला पश्चिम बंगालमधील स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही. त्यामुळे या राज्यात स्थानिक पोलीसांच्या सुरक्षेखाली निवडणुका घेऊ नयेत त्यासाठी इथे सीआरपीएफची नियुक्ती करण्यात यावी, असे प्रसाद यांनी निवडणूक आयोगाला भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

बंगालमध्ये निवडणुकांदरम्यान अनेकदा हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या काळातही इथं हिंसाचाराची शक्यता लक्षात घेता आम्ही निवडणूक आयोगाकडे संपूर्ण पश्चिम बंगाल राज्याला अतिसंवेदनशील राज्य घोषित करण्याची मागणी केली आहे. तसेच सर्वच मतदान केंद्रांवर सीआरपीएफचे जवान तैनात करण्याची मागणी केल्याचे प्रसाद यांनी म्हटले आहे. बंगालमध्ये निवडणुकांदरम्यान माध्यमांवरही अघोषित बंदी असते. मात्र, निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी माध्यमांनाही इथे प्रवेश मिळावा अशी मागणीही निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपाने निवडणूक आयोगाकडे राहुल गांधींची देखील तक्रार केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांविरोधात खोटे आरोप लावले आहेत. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. मंगळवारी अहमदाबाद येथे निवडणूक प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The possibility of violence in bengal during elections give security charge to crpf says bjp to ec

ताज्या बातम्या