काँग्रेस पक्षातील लोकंच विचारधारेपासून दूर गेली, विचारधारेचे प्रशिक्षण पक्षात सक्तीचे केले पाहिजे – राहुल गांधी

देशभरातील काँग्रेसच्या निवडक पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम सेवाग्राम इथे सुरु, कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी होत राहुल गांधीनी केले मार्गदर्शन

Rahul Gandhi on Congress party ideology
Rahul Gandhi on Congress party ideology

सेवाग्राम इथे काँग्रेसच्या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिराला आज सुरुवात झाली. देशभरातील ३० राज्यातील काँग्रेसचे २०० निवडक पदाधिकारी या शिबीरात सहभागी झाले आहेत. चार दिवस विविध वक्ते या शिबिरात सहभागी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराची सुरुवात पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भाषणाने झाली. काँग्रेसच्या विचारधारेवर त्यांनी भाषणात जोर दिला.

“काँग्रेसची विचारधारा लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. पण आपण आपलीच विचारधारा काहीशी बाजुला ठेवली आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा आक्रमकपणे आपल्याच लोकांमध्ये मांडली जात नाही. यासाठी सातत्याने प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. भाजप आणि संघ यांनी काँग्रेसच्या विचारधारेला झाकोळलं आहे. त्यांच्या हातात व्यवस्था आहे. आजच्या भारतात विचारधारेची लढाई ही सर्वात महत्त्वाची आहे. विचारधारेचे प्रशिक्षण हे पक्षात सक्तीचे केले पाहिजे. काँग्रेसची कोणताही व्यक्ती वरिष्ठ असो किंवा कनिष्ठ असो हे प्रशिक्षण सक्तीचे असले पाहिजे. हे प्रशिक्षण वेगवेगळ्या स्तरावर राबवलं गेलं पाहिजे”, असं परखड मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. एकप्रकारे काँग्रेसचेच कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे विचारधारेपासून दूर गेल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्टपणे सांगितलं.

जेव्हा काँग्रेसची विचारधारा परसते तेव्हा व्यक्तिमधील दुःख आणि भय नाहीसं करते. आता वेळ आली आहे की ती मजबूत करण्याची. भाजपच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे चेहरे बघा आणि काँग्रेसचे चेहरे बघा. आपल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असते. तर त्यांचे चेहरे हे सुडाने भरलेले असतात. तुम्ही जे कराल ते प्रेमाने करा असा सल्लाही राहुल गांधी यांनी उपस्थितांना दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The training of congress party ideology should be made compulsory in the party asj

ताज्या बातम्या