आधार कार्ड संदर्भात सरकारकडून दररोज नवे नियम बनवले जात आहेत. आता तर सर्व महत्वाच्या गोष्टींसाठी आधारकार्ड गरजेचे बनले आहे. आधारच्या वापरामुळे सर्वसामान्य माणसाचे जीवन सुकर होईल असा दावा सरकारकडून केला जात आहे. मात्र, आधार अभावी एका आजारी महिलेला सरकारने निवृत्ती वेतन नाकारल्याचे समोर आले आहे.
बेंगळूरू येथील कुष्ठरोगाने पीडित असलेल्या महिलेबाबत हा प्रकार घडला आहे. साजिदा असे या पीडित महिलेचे नाव आहे. या आजारामुळे संबंधित महिलेच्या हाताला बोटेच राहिलेली नाहीत. त्यामुळे आधार कार्ड बनवणे तिच्यासाठी शक्यच नाही. आता तिच्याकडे आधार कार्ड उपलब्ध नसल्याने प्रशासनाने तिला निवृत्ती वेतन नाकारले आहे. दर महिन्याला मिळणारे १ हजार रुपयांचे निवृत्ती वेतनच या महिलेसाठी जीवन जगण्याचा आधार आहे.
दर महिन्याला मिळणाऱ्या पेन्शनमधून ती आपल्या गरजा भागवते. कुष्ठरोगामुळे या महिलेची दृष्टी गेली आहे. तिच्या हाताला बोटेच उरलेली नाहीत. त्यामुळे आधार कार्ड बनवण्यासाठी तिला बायोमॅट्रिक पद्धतीने ते मिळवणे अशक्य आहे. मात्र, प्रशासनाने तिला आधार कार्ड बनवून ते बँकेच्या खात्याशी जोडल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत असे सांगण्यात आले आहे.
साजिदाला तिच्या कुटुंबीयांबाबत विचारल्यानंतर तिने सांगितले की, माझी मुलगी आणि जावई कुठे आहेत, हे मला माहिती नाही. मला भेटायला कोणीच येत नाही. मला जगण्यासाठी पैशाची गरज असून मला माझे पैसे द्या, अशी विनवणी तिने प्रशासनाकडे केली आहे.