काश्मिरींना स्वातंत्र्य हवंय या काँग्रेस नेत्याच्या विधानावर बोलताना भाजपाने देशाबाहेर एक पाकिस्तान आहे आणि काँग्रेसमध्येही एक पाकिस्तान आहे अशी टिका केली आहे. पाकिस्तानमध्ये समाविष्ट होण्याऐवजी काश्मिरींना स्वतंत्र व्हायला आवडेल हे परवेझ मुशर्रफ यांचं विधान योग्य असल्याचे काँग्रेसचे नेते सैफुद्दिन सोझ यांनी व्यक्त केलं होतं ज्यावरून भारतीय जनता पार्टीनं काँग्रेसला टिकेचं लक्ष्य केलं आहे.

“मुशर्रफ म्हणाले होते की काश्मिरींना पाकिस्तानमध्ये विलिन होण्यात रस नाहीये. त्यांची पहिली पसंती स्वतंत्र होण्याला आहे. हे विधान त्यावेळीही बरोबर होतं आणि आजही बरोबर आहे. मी ही हेच म्हणतोय, मात्र मला हे माहित्येय की ते शक्य नाहीये,” सोझ म्हणाले.

सोझ यांच्या वक्तव्याचा संबित पात्रा, अमित मालवीय व रवि शंकर या नेत्यांनी लागलीच समाचार घेतला आहे. “दहशतवादी संस्था लष्कर ए तय्यबा काँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांच्या मताशी सहमती दर्शवते तर दुसरे काँग्रेसचे नेते सोझ म्हणतात की काश्मिरींना स्वतंत्र व्हायचंय. याचा अर्थ भारताबाहेर एक पाकिस्तान आहे आणि काँग्रेसमध्ये एक पाकिस्तान आहे,” संबित पात्रा यांनी ट्विट केलंय. ज्यांना देशाचे तुकडे करायचेत त्यांना काँग्रेसची साथ असल्याचा आरोप रवि शंकर प्रसाद यांनी केला. विशेष म्हणजे सैफुद्दिन सोझ हे युपीए सरकारमध्ये केंद्रात मंत्री होते. सोझ यांचे काश्मीर ग्लिम्पसेस ऑफ हिस्टरी अँड स्टोरी ऑफ स्ट्रगल हे पुस्तक पुढील आठवड्यात प्रकाशित होत आहे. त्यामध्येही अशा प्रकारची मांडणी असण्याची शक्यता आहे.

सोझ यांना 2008 मध्ये जम्मू काश्मीर प्रदेश कमिटीच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले होते. मूळचे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते असलेले सोझ 1999 मध्ये काँग्रेसमध्ये आले. हुरियत कॉन्फरन्सच्या फुटीरतावादी नेत्यांनी चर्चेसंदर्भात मांडलेल्या भूमिका मुख्य राजकीय पक्षांनी समजून घ्यायला हव्या असे मतही सोझ यांनी नुकतेच व्यक्त केले होते. गेल्या वर्षी बुऱ्हान वाणी या दहशतवाद्याचा सुरक्षा जवानांनी खात्मा केला होता. माझ्या हातात परिस्थिती असती तर मी बुऱ्हान वाणीला चर्चा करण्यासाठी जिवंत ठेवलं असतं असंही सोझ म्हणाले होते. अशी पार्श्वभूमी असलेल्या सोझ यांच्या ताज्या वक्तव्याचा भाजपाच्या नेत्यांनी कडक शब्दांमध्ये समाचार घेतला आहे.