शौचालयाच्या खोलीत जर कमोड आणि गॅसचा स्टोव्ह यामध्ये विभाजक असेल तर तेथे अन्न शिजवण्यास हरकत नाही, असे अजब विधान मध्य प्रदेशच्या मंत्री इमारती देवी यांनी केले आहे. राज्यातील अंगणवाडी केंद्रातील कर्मचारी मुलांसाठी शौचालयाच्या खोलीत अन्न शिजवत असल्याची बाब नुकतीच समोर आली होती. या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे विधान केले आहे.

इमारती देवी म्हणतात, ‘या घटनेचा इतका बाऊ करण्याची गरज नाही. कारण, तुम्हाला कळायला हवे की अंगणवाडी केंद्रातील शौचालयाच्या खोलीत कमोड आणि स्टोव्ह यांच्यामध्ये विभाजक बसवलेला होता. आजकाल आपण आपल्या घरातही अशाच प्रकारे अटॅच लॅटरिन-बाथरुम वापरतो. जर आपल्या घरात अशा प्रकारचे अटॅच बाथरुम असेल आणि त्यावरुन जर आपल्या नातेवाईकांनी आपल्या घरी जेवण करण्यास नकार दिला तर आपण काय करु? असा उलटा सवालही त्यांनी विचारला आहे. दरम्यान, या प्रकाराच्या चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मध्य प्रदेशातील अंगणवाडी केंद्रात एका शौचालयासह असलेल्या छोट्या स्वयंपाकघरात मुलांसाठी अन्न शिजवण्यात येत असल्याचे समोर आले होते. या खोलीत जेवण बनवताना लागणारी सामग्री झाकून ठेवलेल्या कमोडवर ठेवण्यात आली होती. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असलेल्या या प्रकारामुळे मध्य प्रदेशात मोठा वाद झाला होता.