राहुल गांधी किंवा पक्षाच्या इतर नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे. आरएसएसकडून पुढील महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण राहुल गांधींना देण्यावरून सुरू असलेल्या चर्चेला खर्गे यांनी उत्तर दिले. आधी निमंत्रण तर येऊद्यात. हे निमंत्रण निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच आहे, असे ते म्हणाले.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वी पक्षाच्या महाराष्ट्र आणि मुंबईच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी खर्गे मुंबईत आले होते. त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

काँग्रेस आरएसएसबरोबर एक वैचारिक लढा देत आहे. पक्षाने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्रिपदही सोडून दिल्याचे त्यांनी म्हटले. कर्नाटकात एक छोट्या प्रादेशिक पक्षाचे (जेडीएस) ३७ आमदार तर आमचे ८० आमदार आहेत. पण धर्मनिरपेक्ष शक्तींना मजबूत करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला आहे. त्यामुळे राहुल गांधी किंवा इतर कोणत्याही नेत्याने संघाच्या मुख्यालयात जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे खर्गे म्हणाले.

आरएसएसची विचारधारा देश आणि दलित वर्गांसाठी विषासारखी आहे. जर राहुल गांधी यांनी मला तिथे जाण्यासाठी विचारणा केली तर अशा लोकांशी मैत्री करण्यात कोणताच अर्थ नाही, असे मी त्यांना स्पष्टपणे सांगेन,  असे खर्गे यांनी सांगितले. आरएसएसच्या पुढील महिन्यात होणाऱ्या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे वृत्त माध्यमांत दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते.

दरम्यान, खर्गे यांनी केंद्र आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारवर मानवाधिकाराची कुचंबणा आणि अघोषित आणीबाणी लावल्याचा आरोप केला. समाजातील बुद्धिजिवी लोकांना नक्षलवादी ठरवत त्यांना धमकवले जात असल्याचेही त्यांनी म्हटले.