बिलासपूर : देशातील औष्णिक वीज केंद्रे कोळसाटंचाईला तोंड देत असतानाच, वीजनिर्मितीसाठी कोळशाचा पुरेसा पुरवठा होण्याबाबत कुठलेही संकट उद्भवणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी दिली.
कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लि.च्या गेवरा, दीपका व कुसमुंडा कोळसा खाणींचा आढावा घेण्यासाठी, तसेच अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यासाठी कोरबा जिल्ह्य़ात जाण्यापूर्वी बिलासपूर विमानतळावर जोशी पत्रकारांशी बोलत होते.
कोळसाटंचाई असल्याचा काँग्रेस बागुलबुवा करत आहे का असे विचारले असता, ‘मला या मुद्दय़ावर राजकारण करायचे नाही. आम्ही आधीच कोळशाची संपूर्ण गरज भागवत आहोत’, असे उत्तर कोळसा मंत्र्यांनी दिले.
‘आज वीजनिर्मितीसाठी ११ लाख टन कोळशाची गरज असून आम्ही यापूर्वीच २० लाख टन कोळसा पुरवला आहे. कोळशाचा साठाही वाढत आहे. देशाची वीजनिर्मितीची गरज भागवण्यासाठी कोळसापुरवठय़ाची काहीही समस्या राहणार नाही अशी मी हमी देतो’, असे जोशी यांनी सांगितले.