गलवान खोऱ्यात चिनी सैन्याबरोबर दोन हात करताना शौर्य गाजवणाऱ्या बिहार रेजिमेंटचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. पंतप्रधानांनी स्तुती केल्यानंतर शनिवारी लष्कराच्या नॉर्दन कमांडने बिहार रेजिमेंटच्या शौर्याची गाथा सांगणारा एक व्हिडीओ टिे्वट केला आहे. विविध युद्धांमधील बिहार रेजिमेंटच्या जवानांच्या शौर्यगाथेची माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे.

बरोबर २१ वर्षांपूर्वी याच महिन्यात कारगिलचे युद्ध सुरु होते. त्यावेळी बिहार रेजिमेंटच्या जवानांनी असाच पराक्रम गाजवून पाकिस्तानकडून बळकावलेला भूभाग परत मिळवला होता. त्याची माहिती या व्हिडीओमधून देण्यात आली आहे. या व्हिडीओमधून चीनला टोलाही लगावण्यात आला आहे. ‘लढण्यासाठीच त्यांचा जन्म झाला आहे. ते बॅट नाही, बॅटमॅन आहेत’ असे या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा- चीनचा हल्ला विफल करण्यासाठी भारताने तैनात केली स्पेशल ‘माऊंटन फोर्स’

या व्हिडीओमध्ये गलवान खोऱ्याचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही. मागच्या सोमवारी गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात बिहार रेजिमेंटचे २० जवान शहीद झाले होते. गलवान खोऱ्याचा उल्लेख नसला तरी या संघर्षात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबूंसह तीन जवानांचे फोटो वापरण्यात आले आहेत. व्हिडीओमध्ये ‘बजरंग बली की जय’ ही युनिटची घोषणा सुद्धा देण्यात आली आहे. बॅट म्हणजे वटवाघुळ. या वटवाघुळाचा करोना व्हायरसशी संबंध असल्याने व्हिडीओमधील बॅट या शब्दाकडे चीनला टोमणा म्हणून पाहिले जाते. सध्या संपूर्ण जग करोन व्हायरसमुळे त्रस्त आहे. या करोना व्हायरसची सुरुवात चीनमधून झाली. हे सत्य चीनने जगापासून लपवले. त्यामुळे चीनला जगाच्या रोषाचा सामना करावा लागत आहेत. त्यामुळे बॅट शब्द वापरुन चीनला अप्रत्यक्ष टोला लगावण्यात आला आहे.