हरियाणामधील हिसार जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील उकलाना जवळील साहू गावामध्ये म्हैस चोरण्यासाठी आलेल्या चोरांनी म्हशीच्या मालकावर गोळीबार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
साहू गावात राहणारा शेतकरी इंद्रपाल हा या जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. ३३ वर्षीय इंद्रपाल नेहमीप्रमाणे आपल्या घरात झोपला असताना त्याची बायको किरणबाला हिला रात्री दोनच्या सुमारास जाग आली. घराजवळच असलेल्या गोठ्यामध्ये कसला तरी आवाज झाल्याने तिने खिडकीतून बाहेर पाहिले असता काही माणसं त्यांची म्हैस गाडीवर चढवताना दिसले. तिने हळूच इंद्रपालला उठवले. इंद्रपाल जसा घराबाहेर पडला तसा त्या चोरांनी गाडी सुरु केली आणि म्हशीला खाली फेकले. मात्र इंद्रपालने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गाडीमधून इंद्रपालवर गोळीबार केला. ही गोळी इंद्रपालला लागल्याने तो रस्त्यावरच पडला. गोळीचा आवज झाल्याने इंद्रपालचे शेजारी त्याच्या मदतीला धावून आले तोपर्यंत चोरांनी गाडीसहीत धूम ठोकली होती.
गंभीर जखमी झालेल्या इंद्रपालला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच साहू गाव ज्या पोलिस स्थानकाच्या हद्दीत येते तेथील पोलिस अधिकारी संदीप कुमार हे घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणात पंचनामा करुन अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरीचा प्रयत्न आणि इंद्रपालवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या संबंधित चोरांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती कुमार यांनी दिली.