गेल्या ४० वर्षांत प्रथमच येथील ‘लिटल इंडिया’ भागात झालेल्या भीषण दंगलीप्रकरणी तिसऱ्या भारतीय नागरिकास १८ आठवडय़ांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. गेल्या ८ डिसेंबर रोजी झालेल्या दंगलीत सहभागी झाल्याच्या आरोपाखाली २८ भारतीयांवर आरोप ठेवण्यात आला होता. त्यांमध्ये सेल्वराज करीकालन याचाही समावेश होता. या प्रकरणी आपण दोषी असल्याची कबुली सेल्वराज याने दिली होती. सेल्वराजला ८ डिसेंबर रोजी अटक झाली होती. त्याच तारखेपासून त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. सेल्वराज हा एका बांधकाम कंपनीत चालकाचे काम करीत असून आधी त्याच्यावर दंगे माजविण्याचा आरोप ठेवण्यात आला होता.याच दंगलीसंदर्भात अन्य दोन भारतीयांनाही १५ आठवडय़ांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याखेरीज अन्य २२ भारतीय नागरिकही दंगलींप्रकरणी खटल्यांना सामोरे गेले आहेत.