उत्तर प्रदेशातील माजी मंत्री चौधरी बशीर यांनी सहावं लग्न केल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची तिसरी पत्नी नगमा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. नगमा यांनी आग्रा येथील मंटोला पोलीस ठाण्यात तक्रार केली.

नगमा यांच्या म्हणण्यानुसार, ११ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचं बशीर यांच्यासोबत लग्न झालं. जेव्हा त्यांनी आपला पती शाइस्ता नावाच्या एका महिलेसोबत २३ जुलैला लग्न करत असल्याची माहिती मिळाली तेव्हा लग्न थांबवण्यासाठी त्या तिथे पोहोचल्या. यावेळी बशीर यांनी नगमा यांना सर्वांसमोरच तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट दिला. नगमा यांनी पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.

पोलिसांना बशीर यांच्याविरोधात छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान बशीर आणि नगमा यांच्यातील वाद सध्या कोर्टात सुरु असल्याचीदेखील माहिती आहे. चौधरी बशीर हे मायावती यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात गेले होते. पण तिथेही ते जास्त काळ राहिले नाहीत.