सध्या देशभरामध्ये बेरोजगारी आणि मंदीची चर्चा आहे. नोकरीसाठी भटकणाऱ्यांपैकी प्रत्येकाला आपल्याला सरकारी नोकरी मिळावी असे वाटते. सरकारी नोकरीसाठी अनेकजण वाटेल ते करायला तयार असतात. असे असले तरी अनेकदा प्रयत्न करुनही अनेकांना सरकारी नोकरी मिळत नाही. पण बिहारमधील एक व्यक्ती मागील ३० वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी तीन सरकारी नोकऱ्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार समोर आल्यानंतर अटकेच्या भितीने ही व्यक्ती फरार झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरेश राम असे या एकाच वेळी तीन सरकारी कार्यालयांमध्ये नोकरी करणाऱ्या इसमाचे नाव आहे. पाटण्यामधील बभौल गावात राहणारा सुरेश हा एकाच वेळी दोन वेगवेगळ्या खात्यांमध्ये मागील ३० वर्षांपासून तीन वेगवेगळ्या सरकारी पदांवर कार्यरत होता. विशेष म्हणजे मागील तीस वर्षांपासून या व्यक्तीला तीन्ही नोकऱ्यांचा पगार दिला जात आहे. आता हे प्रकरण उघडकीस आल्या नंतर सुरेशला एकाच वेळी तीन नोकऱ्या मिळाल्या कशा याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. किशनगंजमध्ये बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता, बंका तालुक्यातील बेल्हार प्रकल्पामध्ये जलंसंधारण सहाय्यक अभियंता, भीमनगर पूर्व येथील जलसंधारण सहाय्यक अभियंता या तीन पदांवर सुरेश एकाच वेळी काम करत होता.

२० फेब्रुवारी १९८८ रोजी पाटण्यातील सार्वजिनिक आणि रस्ते बांधाकाम विभागामध्ये सुरेश कनिष्ठ अभियंतापदावर रुजू झाला. ही त्याची पहिली नोकरी होती. या विभागामध्ये एक वर्ष काम केल्यानंतर २८ जुलै १९८९ रोजी त्याला जलसंधारण विभागातून नोकरीची ऑफर आली. सुरेशने आहे त्या नोकरीचा राजीनामा न देता ही ऑफर स्वीकारली. एकाच वेळेस दोन नोकऱ्या करत असतानाच जलसंधारण विभागानेच त्याला तिसऱ्या नोकरीची ऑफर दिली. सुरेशने हा गोंधळ विभागाला न कळवता तिसरीही नोकरी स्वीकारली.

बिहारमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा हिशोब ठेवण्यासाठी सीएफएमएस ही नवीन यंत्रणा लागू झाल्यानंतर सुरेशचा खोटारडेपणा उघड झाला आहे. पगारासाठी या यंत्रणेमध्ये कर्मचाऱ्याचा आधारकार्ड क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन कार्ड नंबर देणे आवश्यक असते. याच अटीमुळे सुरेशचा खोटारडेपणा उघड झाला. काही वर्षांमध्ये सुरेश एकाच वेळी या तिन्ही नोकऱ्यांमधून निवृत्त होणार होता. मात्र नवीन यंत्रणेमुळे आपला भांडाफोड होणार हे लक्षात आल्यानंतर सुरेश फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

सुरेश ज्या ज्या ठिकाणी काम करत होता त्या तिन्ही पोलीस स्थानकांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This bihar man had three different government jobs at the same time for 30 years scsg
First published on: 27-08-2019 at 13:22 IST