मला शिव्या देणाऱ्या, माझ्या गरीब कुटुंबाचा उपहास करणाऱ्या आणि माझ्या कुटुंबियांबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना मी सांगू इच्छितो की, हा देशच माझे सर्वस्व आहे. माझा प्रत्येक क्षण हा भारत आणि १२५ कोटी भारतीयांसाठी समर्पित असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते शनिवारी गुजरातच्या लुनवाडा येथील प्रचारसभेत बोलत होते.

यावेळी मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला. देशाच्या प्रत्येक भागातील मुस्लिम समाजाची काँग्रेसने दिशाभूल केली. काँग्रेसने मुस्लिमांना आरक्षणाबाबत खोटी अश्वासने दिली. या आश्वासनांची त्यांनी कधीही पुर्तता केली नाही, असे मोदी यावेळी म्हणाले.

मोदी म्हणाले, सलमान निझमी हा युवा काँग्रेसचा नेता सध्या गुजरातमध्ये निवडणूक प्रचाराचे काम करीत आहे. त्याने ट्विटरवर राहुल यांच्या वडील आणि आजी यांच्याबाबत लिहीले आहे. इथपर्यंत ठीक आहे. मात्र, त्याने ट्विटवरून तुमचे आई-वडील कोण आहेत? असा प्रश्न मला विचारला. मी माझ्या शत्रुशीही अशाप्रकारे वागणार नाही. याशिवाय, सलमान निझवीने स्वतंत्र काश्मीरचे नारेही दिले आहेत.

भारतीय लष्कराला त्याने बलात्कारी संबोधले आहे. देशातील जनता अशा लोकांना कशी काय स्वीकारू शकते, असा सवाल त्यांनी केला. त्याचबरोबर प्रत्येक घरात अफझल असल्याचे तो म्हणाला होता, असेही मोदींना यावेळी सांगितले. संपूर्ण देशाने काँग्रेसला नाकारले आहे. गुजरातमध्येही लोक काँग्रेसला नाकारतील तसेच त्यांना आणि त्यांच्या राजकारणाला शिक्षा देतील, असे मोदींनी सांगितले.