बेकायदेशीररित्या संपत्ती बाळगणाऱ्या नागरिकांनी आपल्याकडील अघोषित संपत्ती ३० सप्टेंबरपर्यंत जाहीर करण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. मन की बात या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी संवाद साधला.
मोदी म्हणाले की, ज्यांच्याकडे अघोषित मालमत्ता आहे त्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत स्वत:हून याची माहिती द्यावी. संबंधितांनी स्वत: सर्व माहिती दिल्यास सरकार कुठलीही चौकशी करणार नाही. मात्र, त्यानंतर अशा व्यक्तींची नावे उघड झाल्यास कर बुडव्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात फक्त दीड लाख लोकांचे उत्पन्न ५० लाखांहून अधिक असल्याची खंत आहे. नियमित कराचा भरणा करणार्यांची देखील यापुढे काळजी घेतली जाणार आहे, असेही ते म्हणाले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात अंतर्गत आणीबाणी लागू केली होती. आज या आणीबाणीला ४० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याविषयी बोलताना मोदी म्हणाले की, भारताच्या लोकशाहीच्या इतिहासात आजच्या दिवशी म्हणजेच २६ जून १९७५ रोजी काळी रात्र आली होती. जेपी, लोहियासह अनेक नेत्यांना आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकण्यात आले होते. रेडियो व वृत्तपत्रांना निर्बंध घालण्यात आले होते. आणीबाणीच्या माध्यामांतून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला, असे बोलत मोदींनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jun 2016 रोजी प्रकाशित
३० सप्टेंबरपर्यंत अघोषित मालमत्ता जाहीर करा – मोदी
संबंधितांनी स्वत: सर्व माहिती दिल्यास सरकार कुठलीही चौकशी करणार नाही.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 26-06-2016 at 13:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Those with undisclosed assets can declare them before september 30 pm modi in mann ki baat address