नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आतंरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी रात्री उशीरा मोठा गोंधळ पहायला मिळाला. प्रवाशांच्या बॅगा तपासणारी सुरक्षा यंत्रणा बंद पडल्याने विमानतळावर खळबळ उडाली. यामध्ये हजारो प्रवाशांच्या बॅगा हरवल्या. यंत्रणेत बिघाड झाल्याने कुठल्याच विमानांमध्ये बॅगा लोड होऊ शकल्या नाहीत, असे दिल्ली विमानतळाच्या प्रशासनाने सांगितले.

एअरपोर्ट अथॉरिटीच्या म्हणण्यानुसार, इतर सर्वसामान्य दिवसांपेक्षा गुरुवारी प्रवाशांच्या बॅगांमध्ये मोठ्या प्रमाणावर पॉवर बँक आणि लायटर आढळल्याने तपासणीदरम्यान मोठी अडचण निर्माण होऊन सर्वत्र गोंधळ निर्माण झाला.

विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यांची संख्या इतर दिवसांच्या तुलनेत ३० टक्के जास्त होती. त्यामुळे तपासणीसाठी सुरक्षा उपकरणांबरोबरच सुरक्षा रक्षकांचीही मदत घेण्यात येत होती. त्यानंतर विमानतळावर मोठा गोंधळ उडाला.

विस्तारा एअरलाईन्सने सांगितले की, विमानतळावर प्रवाशांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले. चेक केल्यानंतर बॅगेज हँडलिंग सिस्टिम बंद पडले. त्यामुळे फ्लाईट्समध्ये हजारो बॅगा लोड होऊ शकल्या नाहीत. या गोंधळामुळे या परिस्थितीवर नियंत्रणासाठी त्यांना सुरक्षा अधिकाऱ्यांची मदतही घ्यावी लागली.