कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या सात मालमत्तांपैकी एका मालमत्तेसाठी माजी पत्रकार एस.बाळकृष्णन यांनी बोली लावली असता त्यांना दाऊदचा साथीदार छोटा शकील याने धमकी दिली. बाळकृष्णन यांनी ही माहिती पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे.
त्यांनी सांगितले की, मला छोटा शकीलचा एसएमएस आला असून तुम्ही लिलावात भाग घेत आहे. तुम्हाला काय झाले आहे, तुम्ही ठीक आहात ना, असे त्याने एसएमएसमध्ये म्हटले आहे.
ही त्याची दुसऱ्याला गप्प बसवण्याची पद्धत आहे. मी स्वयंसेवी संस्था असलेल्या देश सेवा समितीच्या वतीने बोली लावली होती. ही संस्था महिला व बाल कल्याणासाठी काम करते. त्या ठिकाणी आम्ही संगणक प्रशिक्षण संस्था चालवू इच्छितो. त्या केंद्राला अशफकउल्लाखान या देशभक्ताचे नाव देण्याची इच्छा आहे.
पाकिस्तानात बसलेला एक माणूस भारतात त्याच्या अटींवर दादागिरी करू शकत नाही, असे सांगून ते म्हणाले की, मी अजून याबाबत पोलिसांना माहिती दिलेली नाही. या मालमत्तेची राखीव किंमत १.१८ कोटी रुपये आहे व आमच्याकडे काही निधी आहे व उरलेली रक्कम आम्ही उभी करू. दाऊदची ही मालमत्ता दक्षिण मुंबईत पाकमोडिया रस्ता येथे आहे, तो दाऊदचा अड्डा मानला जात असे. मालमत्तेचा लिलाव ९ डिसेंबरला कुलाब्यातील हॉटेल डिप्लोमॅट येथे होणार आहे.
दाऊदच्या सात मालमत्तांचा सक्षम अधिकाऱ्यांच्या मार्फत लिलाव होत असून अमली पदार्थ तस्करी व परकीय चलन कायदा १९७६ अन्वेय ही मालमत्ता जप्त करण्यात आली होती.
माजी पत्रकार बाळकृष्णन यांनी लिलावापूर्वी पाकमोडिया रस्त्यावरील या मालमत्तेला भेट दिली. तिथे एक तळमजला त्यावर एक मजला अशी रचना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Threat call to journalist who want to buy dawood property
First published on: 06-12-2015 at 03:10 IST