इंडिगो या विमान कंपनीच्या एका विमानातील स्वच्छतागृहात धमकी देणारी एक चिठ्ठी आढळली. मुंबईत आलात तर तुम्ही प्रत्येकजण मारले जाल, असा संदेश या चिठ्ठीत लिहिण्यात आला होता. चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या विमानात मंगळवारी (१३ फेब्रुवारी) हा प्रकार समोर आला. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार विमान मुंबईत उतरल्यानंतर सर्व चाचण्या, चौकशी करण्यात आली. मात्र कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळलेली नाही. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास केला जात आहे.

टिश्यू पेपवर धमकीचा संदेश

मिळालेल्या माहितीनुसार चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो या विमान वाहतूक कंपनीच्या ६ई५१८८ या विमानात टिश्यू पेपरच्या रुपात एक चिठ्ठी आढळली. मुंबईमध्ये याल तर तुम्ही सगळे मारले जाल, असा संदेश या टिश्यू पेपरवर लिहिण्यात आला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली तसेच प्रवाशांचीही चौकशी करण्यात आली. मात्र पोलिसांना कोणतीही संशयास्पद बाब आढळली नाही. या प्रकरणी विमानतळावरील पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व प्रक्रिया पूर्ण

या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोध आयपीसीच्या कलम ५०५ तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इंडिगो विमान कंपनीने निवेदन जारी केले. “इंडिगो कंपनीचे ६ई५१८८ हे विमान चेन्नईहून मुंबईला जात होते. या विमानात बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यानंतर गरजेच्या सर्व उपायोजना करण्यात आल्या तसेच निश्चित प्रक्रिया पार पाडण्यात आली. ही धमकी मिळाल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमान सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले,” असे इंडिगोच्या निवेदनात सांगण्यात आले आहे.