तारापूर औद्योगिक वसाहतीतील दुर्घटना, डॉक्टरांनाही बाधा

तारापूर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात रविवारी विषारी वायूची गळती होऊन व्यवस्थापकासह तीन कामगारांचा मृत्यू झाला. हा वायू इतका घातक होता की कामगारांना तपासताना डॉक्टरांनाही वायूची बाधा झाली. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

औद्योगिक क्षेत्रातील एस्क्वॉयर या रासायनिक कारखान्याच्या साठवण टाकीत रासायनिक प्रक्रिया सुरू असताना ही दुर्घटना घडली. रासायनिक प्रक्रिया करताना घडलेल्या उलट प्रक्रियेमुळे टाकी फुटली आणि विषारी वायू बाहेर पडला. त्यामुळे तेथे उपस्थित असलेले कारखान्याचे व्यवस्थापक प्रभाकर खडसे (५९), रघुनाथ गोराई (५०), दत्तात्रेय घुले (२५) यांना विषारी वायूची बाधा झाली. त्यांना बोईसर येथील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात कामगारांची तपासणी करताना ते मृत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या वेळी डॉक्टरांनाही वायूची बाधा झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील एका बंद खोलीत ठेवण्यात आले होते, परंतु विषारी वायूचा वास बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांना जाणवत होता. त्यामुळे त्यांनी तोंडावर रुमाल बांधले होते. अतिदक्षता विभागात नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला होता. दरम्यान, संध्याकाळपर्यंत कारखान्यांचा मालक रुग्णालयात फिरकला नव्हता. मृत कामगारांच्या नातेवाईकांना दुर्घटनेची माहिती कळविण्यासाठी त्यांचा पत्ताही मिळत नव्हता.

कामगार वसाहतीला धोका

दुर्घटना झालेल्या एस्क्वॉयर कारखान्यापासून १० मीटरवर कामगारांची वसाहत आहे. तेथे १०० कामगार राहतात. दुर्घटनेनंतर पोलिसांनी या वसाहतीतील कामगारांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले. ही कामगार वसाहत बेकायदा असल्याचे सांगण्यात आले.