उत्तर भारतामध्ये वादळाचे संकट मंगळवारी रात्री देखील कायम असून राजस्थान, पंजाब, हरयाणा आणि दिल्ली-एनसीआर भागाला वादळाचा तडाखा बसला. सोसाट्याचा वारा आणि पावसाचा फटका वाहतुकीला बसला आहे.

सोमवारी रात्री दिल्लीसह उत्तर भारतात वादळी वारे धडकले. वादळाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मंगळवारी सायंकाळी भरणाऱ्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या. उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्येही शाळ बंद ठेवण्यात आल्या.  मंगळवारी रात्री देखील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू- काश्मीर, हरयाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडील भागात ताशी ५० ते ७० किमी या वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दक्षिण पूर्व दिल्लीत बदरपूर परिसरात मंगळवारी रात्री इमारतीची संरक्षक भिंत खचल्याने तीन मुलांसह एक महिला जखमी झाली. वादळाच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच वीजेच्या खांबांजवळ थांबू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.