ब्रिटनस्थित व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातील (व्ही अँड ए) १७ व्या शतकातील ‘वाघनखे’ भारतात आणण्यासाठी हे संग्रहालय महाराष्ट्र सरकारशी येत्या मंगळवारी सामंजस्य करार (एमओयू) करणार आहे. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची होती, असे मानले जाते.

विजापूरच्या आदिलशाहचा सरदार अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये केला होता. तेव्हा या दोघांच्या भेटीत महाराजांनी हातात वाघनखे लपवली होती आणि त्याद्वारेच हा वध केला होता. तीच ही वाघनखे असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा >>> भारत-अमेरिका संबंध चंद्रयानाप्रमाणे सर्वोच्च स्तरावरच परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा विश्वास

ही वाघनखे ईस्ट इंडिया कंपनीचे तत्कालीन अधिकारी जेम्स ग्रँड डफ जेव्हा १८१८ मध्ये तत्कालीन सातारा प्रांताचे राजकीय मध्यस्थ होते. तेव्हा त्यांच्या ताब्यात आली होती. ही वाघनखे डफ त्यांच्या वंशजांनी नंतर या वस्तुसंग्रहालयाला भेट दिली होती, असे सांगण्यात येते.

संग्रहालयाच्या प्रवक्त्याने सांगितले, की व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालय या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वरिष्ठ नेत्यांचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफझलखानावर विजयाची ही महत्त्वाची ऐतिहासिक घटना होती. त्यामुळे  शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण होत असताना होणाऱ्या सोहळय़ानिमित्त ही ‘वाघनखे’ म्हणून भारताला भेट दिली जात आहेत, त्यामुळे आनंद होत आहे. वाघनखांच्या भारतातील प्रदर्शनानंतर इतिहासातील नवीन संशोधनाला चालना मिळेल, अशी आम्हाला आशा वाटते. या सामंजस्य करारावर येत्या मंगळवारी स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही वाघनखे या वर्षअखेरीनंतर एका निश्चित काळासाठी भारतात पाठवली जातील.

संग्रहालयाने दिलेल्या माहितीनुसार डफ स्कॉटलंडमध्ये परतल्यानंतर या वाघनखांना एका छोटय़ा बंदिस्त पेटीत (फिटेड केस) ठेवले  होते. त्यावर ‘शिवाजी महाराजांची वाघनखे ज्याद्वारे सेनापतीला मारले गेले’ असा उल्लेख आहे. ही वाघनखे ईडनच्या जेम्स ग्रँट डफ यांना ते साताऱ्याचे राजकीय मध्यस्थ असताना मराठा साम्राज्याच्या पेशव्यांकडून दिली गेल्याची माहितीही या संग्रहालयाद्वारे देण्यात आली.

शहानिशा नाही

ही वाघनखे सुमारे १६० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली होती अथवा नाही, याची शहानिशा करणे शक्य झालेले नाही, असेही या ब्रिटिश संग्रहालयाने या संदर्भात स्पष्ट केले आहे.

‘बालबुद्धी’ प्रश्नांना उत्तर देणार नाही- फडणवीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाघनखांबाबत आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, याचे मला आश्चर्य वाटत नाही. कारण, संजय राऊत यांनीही छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागितले होते. आदित्य ठाकरे यांचे प्रश्नही ही ‘बालबुद्धी’ आहे. त्यामुळे उत्तर देणार नाही. राज्याचे मंत्री मुनगंटीवार आणि अधिकारी वाघनखे भारतात आणण्यासाठी  ब्रिटनला जात आहेत.