Tirupati Balaji Mandir: आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील एका अधिकाऱ्याला तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) प्रशासनाने तात्काळ निलंबित करण्याची कारवाई केली आहे. ए राजाशेखर बाबू असं निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. ते सहाय्यक कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. मात्र, ए राजाशेखर बाबू हे चर्चमधील प्रार्थनेमध्ये उपस्थित राहिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्या आरोपानंतर तिरुमला तिरुपती देवस्थान प्रशासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थान प्रशासनाने केलेल्या या कारवाईनंतर आता यावरून चर्चा रंगली आहे. मात्र, गैर-हिंदू धार्मिक कार्यात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा एक भाग म्हणून टीटीडी प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचं स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. सदर कर्मचारी दर रविवारी चर्चमधील प्रार्थनेला उपस्थित राहत ख्रिश्चन धर्माचा प्रचार-प्रसार करण्यात सहभागी होत असल्याचा आरोप झाल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

मंदिर प्रशासनाने काय म्हटलं?

दरम्यान, या घटनेबाबत मंदिर प्रशासनाने एक निवेदन प्रसिद्ध केलं. त्यामध्ये म्हटलं की, “तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) प्रशासनाच्या निदर्शनास आलं की, ए राजाशेखर बाबू हे त्यांच्या मूळ गावी पुत्तूरमध्ये दर रविवारी स्थानिक चर्चच्या प्रार्थनेला उपस्थित राहतात. हे वर्तन टीटीडीच्या नियमांचं स्पष्ट उल्लंघन आहे. त्यामुळे ए राजाशेखर बाबू यांनी मंदिर प्रशासनाच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच टीटीडी दक्षता विभागाने आरोपांना समर्थन देणारा अहवाल आणि इतर पुरावे सादर केल्यानंतरही कारवाई करण्यात आली आहे”, असं निवदेनात म्हटलं आहे.

दरम्यान, टीटीडीच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की, राजाशेखर बाबू हे पुत्तूर येथील स्थानिक चर्चच्या प्रार्थनेला नियमितपणे उपस्थित राहत असल्याचं निदर्शनास आल्यानंतरच संबंधित कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान यापूर्वी देखील टीटीडीने अशाच कारणांमुळे शिक्षक, तांत्रिक अधिकारी, परिचारिका आणि इतर अधिकाऱ्यांसह किमान १८ कर्मचाऱ्यांची बदलीची कारवाई केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंदिरातील प्रसादामध्ये जनावरांच्या चरबीचा वापर झाल्याचा झाला होता आरोप

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर झाल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली होती. खरं तर तिरुमला तिरुपती देवस्थान हे जगभरात प्रसिद्ध आहे. तसेच त्या ठिकाणी असलेले प्रसादाचे लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात. मात्र, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या आरोपानंतर आंध्र प्रदेशतील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं होतं.