भावाला किडनी दान करण्यासाठी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असलेल्या तरूणानं आजारी असलेल्या भावाला किडनी मिळावी यासाठी आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे

प्रातिनिधिक छायाचित्र
इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असलेल्या तरूणानं आजारी असलेल्या भावाला किडनी मिळावी यासाठी आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. परंतु त्याचा त्याग व्यर्थ गेला आहे. हॉस्टेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पार्थिवाची स्थिती अवयवदान करण्यापलीकडे गेल्यामुळे त्याच्या किडनी भावाला देता आल्या नाहीत.

वलसाडजवळच्या पारडी इथला नैतीकुमार तांडेल इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात होता. बडोद्यामध्ये हॉस्टेलमध्ये त्याला गळफास घेतलेलया अवस्थेत त्याच्या सहकाऱ्याला तो आढळला. त्याने पोलिसांना व संस्थेला ही घटना कळवली. पोलिसांना आत्महत्येचं कारण सांगणारी चिठ्ठी मिळाली. या प्रकरणी कुणाचीही पोलिसांनी चौकशी करू नये असं त्यानं चिठ्ठीत लिहिलं होतं. नैतीकुमारनं लिहिलं होतं की त्याचा मोठा भाऊ केनीश हा अत्यंत आजारी असून त्याच्या दोन्ही किडनी खराब झाल्या आहेत आणि किडनीदानाची गरज आहे. माझ्या किडनी त्याला द्याव्यात तसेच अन्य अवयवही गरजूंना द्यावेत अशी इच्छा त्यानं व्यक्त केली होती, असं पोलिसांनी सांगितले.

परंतु ज्यावेळी आम्हाला त्याचं शव मिळालं त्यावेळी त्या अशा अवस्थेत होतं की अवयवदान अशक्य होतं. डॉक्टरांनी शवाची तपासणी केल्यानंतर सांगितलं की त्याचा जीव जाऊन किमान ३६ तास झाले आहेत आणि आता अवयवदान करता येणार नाही.

चार दिवसांपूर्वी त्याच्या आईचं त्याच्याशी बोलणं झालं होतं, परंतु त्यावेळी त्याच्या बोलण्यामध्ये वेगळं असं काही जाणवलं नव्हतं असं तिनं सांगितलं. तांडेल कुटुंबियांवर या घटनेनं आकाश कोसळलं आहे. एका मुलाच्या दोन्ही किडनी खराब झाल्या आहेत, तर दुसऱ्यानं त्याला वाचवण्यासाठी आत्महत्या केली आहे. त्यांचे वडील निवृत्त आहेत तर आई घर सांभाळते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: To donate kidney to brother engineering student commits suicide