पिकांचे नुकसान, वृक्ष उन्मळून पडले
दक्षिण कन्नड जिल्ह्य़ातील सिरिबागीलू गावातील अनेक भागांना मंगळवारी बसलेल्या वावटळीच्या जोरदार तडाख्यात वन्य भागाचे आणि नजीकच्या परिसराचे अतोनात नुकसान झाले आहे. या वावटळीमुळे अनेक वृश्र उन्मळून पडले असून परिसरातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
सोसाटय़ाच्या वाऱ्याचा तडाखा जवळपास आठ कि.मी. परिसराला बसला असून त्यामध्ये काही घरे, दुकाने, नारळ आणि केळीची झाडे उन्मळून पडली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले, असे अधिकारी म्हणाले.
मणिबंधा आणि अनिला गावामधील रस्त्यावर उन्मळलेले वृक्ष कोसळल्याने गुंद्या-सुब्रह्मण्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिकांनी कोसळलेले वृक्ष कापून वाहतूक बुधवारी काही प्रमाणात सुरू केली आहे. रस्त्यावर पडलेले वृक्ष बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी किमान एका आठवडय़ाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सोसाटय़ाच्या वाऱ्यांचा तडाखा विजेच्या खांबांनाही बसला असून त्यांचे नुकसान झाले आहे, असे मंगळुरू वीजपुरवठा कंपनीने सांगितले. जवळपास सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. जंगलातही ४०० ते ५०० एकर परिसरात वृक्ष उन्मळून पडल्याचे दिसत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बाधित शेतकऱ्यांना प्रतिएकर एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पुत्तूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष कृष्णा शेट्टी यांनी सरकारकडे केली आहे.