अमेरिकेतील वादळात आतापर्यंत ३६ जण मरण पावले असून वादळ सहा राज्यात पसरल्याने मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे अमेरिकी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. तेथील वातावरण मोठय़ा प्रमाणात खराब होत चालले आहे, तेथे मोठय़ा गारा पडण्याचीही शक्यता आहे.
 मिसीसीपी, अलाबामा व टेनिसी येथे सोमवारी १७ जण ठार झाल्याचे सीएनएन टेलिव्हिजनने म्हटले आहे. इतर १८ जण अरकान्सास, आयोवा व ओकलाहोमा येथे रविवारी ठार झाले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार हवामान आणखी खराब होत चालले असून ७ कोटी लोकांना त्याचा फटका बसणार आहे. राष्ट्रीय हवामान सेवेने म्हटले आहे की, पूर्व व दक्षिण मिसिसीपी, पश्चिम अलबामा व पूर्व लुईझियाना येथे मोठय़ा प्रमाणात वादळ येणार असून मोठय़ा आकाराच्या गारा पडण्याची शक्यता आहे. अलाबामा विद्यापीठाचा विद्यार्थी जॉन सेरवाती हा मैत्रिणीला पडत्या भिंतीपासून वाचवताना मारण पावला. तुपेलो, मिसिसीपी येथील लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तेथे अनेक घरे व उद्योग उद्ध्वस्त झाले युवकांनी ढिगारे उपसण्यास व लोकांना बाहेर काढण्यास मदत केली.