देशातील व्यापाऱयांमध्ये सैन्यातील जवानांपेक्षा जोखीम पत्करण्याची अधिक क्षमता असल्याचे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी म्हटले. ते नवी दिल्लीत व्यापाऱयांच्या परिषदेत बोलत होते.
माझा देशातील व्यापाऱयांवर पूर्ण विश्वास आहे. जागतिक व्यापारी स्पर्धेला घाबरण्याची आवश्यकता नाही. देशात भाजपचे सरकार आल्यावर व्यापाराला नवा दृष्टीकोन मिळेल असा विश्वासही नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केला. सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे वाभाडे काढत सामान्य माणसाची पैसे खर्च करण्याची क्षमता हे सरकार वाढवू शकले नाही. मग छोटे व्यापारी कसे तग धरतील? छोट्या व्यापाऱयांची मिळकत कशी वाढेल? असे सवालही उपस्थित केले. तसेच संपूर्ण युरोपमध्ये जितके व्यापारी नाहीत, त्याहून कितीतरी पटीने अधिक व्यापारी भारातातील एका राज्यात असल्याचे म्हणत मोदींनी आपल्या गुजरातवर स्तुतीसुमनेही उधळली.
देशातील ग्राहक आता ऑनलाईन शॉपिंगकडे वळत आहेत. मग त्यांना दुकानांची काय गरज? असे म्हणत व्यापाऱयांना ऑनलाईन व्यापाराकडे लक्ष देण्याचा सल्लाही मोदींनी दिला. ग्राहकांना पुस्तके आता ऑनलाईन वाचता येतात मग ते दुकानात येऊन पुस्तके का खरेदी करतील? असे उदाहरण देऊन ऑनलाईन व्यापाराचे महत्व मोदींनी पटवून दिले. जो व्यक्ती जोखीम उचलण्याची क्षमता ठेवत नाही तो कधीच व्यापारी होऊ शकत नाही आणि लहान व्यापारीसुद्धा या क्षेत्रात मोठी मजल मारण्याची क्षमता ठेवू शकतो असेही मोदी पुढे म्हणाले.